मोसंबीची ७०० रोपे टाकली तोडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:10 AM2019-04-23T01:10:11+5:302019-04-23T01:10:29+5:30

पाच एकर बागेतील ७०० मोसंबीचे रोपे अज्ञाताने तोडून टाकल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री दाढेगाव शिवारात घडली.

700 plants of Citrus limetta cut off | मोसंबीची ७०० रोपे टाकली तोडून

मोसंबीची ७०० रोपे टाकली तोडून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : पाच एकर बागेतील ७०० मोसंबीचे रोपे अज्ञाताने तोडून टाकल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री दाढेगाव शिवारात घडली. ऐन भरात आलेली बाग जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे १० ते १२ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अंबड तालुक्यातील दाढेगाव येथे उमेश संदीपान गव्हाणे यांची शेती आहे. गट क्र. १७८ मधील पाच एकर शेतीत त्यांनी मोसंबीची ७०० रोपे लावली होती. यंदाच्या भीषण दुष्काळातही गव्हाणे यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून सर्व रोपे जगविली होती. रोपांची चांगली वाढ झाल्याने बाग फुलून दिसत होती. मात्र, रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने मोसंबीची रोपे तोडून टाकली.
घटनेची माहिती प्राप्त होताच गोंदी पोलिसांना घटनास्थळी येऊन पंचनामा केला. उमेश गव्हाणे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी म्हणून आशपाक फतरु सय्यद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यंदा दुष्काळ असल्यामुळे गव्हाणे यांनी मोठ्या हिंमतीने या मोसंबीचे रोपटे जोपासली. यावर अमाप खर्च देखील केला होता. पण, एका रात्रीत मोसंबीच्या रोपट्यांचे होत्याचे नव्हते झाले. यामुळे गव्हाणे हतबल झाले आहेत. त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे या मोसंबीच्या रोपांची जोपासना केली होती. तसेच मोसंबीवर त्यांनी केलेला अमाप खर्च देखील आता वाया गेल्याने पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
२० मार्चलासुद्धा गव्हाणे यांच्या शेतातील विद्युत केबल, मोटार, ठिबक आदी शेतीस आवश्यक साधनांची तोडफोड करण्यात झाली होती. याबाबत गुन्हाही दाखल झाला होता. याच वेळी पोलिसांनी तपास केला असता तर आज नुकसान टळले असते, अशी खंत हतबल झालेल्या गव्हाणे यांनी व्यक्त केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून एवढी मोठी झाडे तोडण्याचा त्या व्यक्तीचा नेमका उद्देश काय होता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: 700 plants of Citrus limetta cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.