३५६ शाळांतील ७२८७ विद्यार्थ्यांनी दिली अध्ययन संपादणूक सर्वेक्षण परीक्षा
By विजय मुंडे | Published: March 24, 2023 06:49 PM2023-03-24T18:49:25+5:302023-03-24T18:50:07+5:30
डायटमार्फत परीक्षा : शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिल्या शाळांना भेटी
जालना : प्रत्येक वर्गाच्या अध्ययन निष्पतीनुसार त्या वर्गातील मुलांना काय येणे अपेक्षित आहे, याची चाचपणी करण्यासाठी घेतली जाणारी अध्ययन संपादणूक सर्वेक्षण परीक्षा शुक्रवारी घेण्यात आली. यापरीक्षेत जिल्ह्यातील ३५६ शाळांतील ७२८७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी शासनस्तरावरून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शाळांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासह शैक्षणिक अभ्यासक्रमासह इतर परीक्षाही घेतल्या जातात. त्या- त्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलांना अपेक्षित ज्ञान असणे गरजेचे आहे. विद्यार्थी ज्या वर्गात शिक्षण घेत आहे त्या वर्गाच्या अध्ययन निष्पतीनुसार त्याला ज्ञान असणे आवश्यक आहे. याची तपासणी करण्यासाठी १७ मार्च रोजी अध्ययन संपादणूक सर्वेक्षण परीक्षा घेतली जाणार होती. परंतु, सरकारी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आणि शिक्षकांनीही या संपात सहभाग घेतला. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
सरकारी कर्मचारी संघटनांचा संप मिटल्यानंतर शिक्षक कर्तव्यावर रुजू झाले. त्यानुसार शुक्रवारी २४ मार्च रोजी जिल्ह्यातील ३५६ शाळांमध्ये अध्ययन संपादणूक सर्वेक्षण परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ७२८७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. डायटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्हा नोडल अधिकारी डॉ. संजय येवते, श्रीहरी दराडे, डायटचे डॉ. योगेश्वर जाधव, जालिंदर बटोळे, सय्यद अख्तर, प्रेरणा मोरे, विनोद राख यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले.
निकाल लवकरच घोषित होणार
जिल्ह्यातील ३५६ शाळांमध्ये अध्ययन संपादणूक सर्वेक्षण परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल लवकरच घोषित केला जाणार असून, परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्या वर्गाच्या अध्ययन निष्पतीनुसार किती ज्ञान आहे याची माहिती या परीक्षेच्या निकालातून समोर येईल.
- डॉ. संजय येवते, नोडल अधिकारी, जालना