जाफराबाद तालुक्यातील ७४ गावे पोलीस पाटलाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:27 AM2021-03-07T04:27:44+5:302021-03-07T04:27:44+5:30
जाफराबाद : ग्रामीण भागात ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासनामधील अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतात. परंतु, ...
जाफराबाद : ग्रामीण भागात ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासनामधील अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतात. परंतु, जाफराबाद तालुक्यातील १०१ पैकी २७ गावांतच पोलीस पाटील कार्यरत आहेत. अद्याप ७४ गावांत पोलीस पाटील नसल्याने तेथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आहे.
गेल्या काही वर्षांपासून शासनाकडून ही पदे भरण्यात आली नाहीत. व्हॉट्सॲप व आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात एखादी सामाजिक माहिती मिळण्यास वेळ लागत नसला तरी ती कितपत खरी आहे हे कळत नाही. अशा वेळी पोलीस पाटील हे गावाचे प्रमुख म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
सध्या कोरोना गावागावात पोहोचला आहे. कोरोना संकटाच्या काळात काही गोष्टी अडचणीच्या ठरू लागल्या आहेत. गावात होणारे वादविवाद गावातच मिटावे, गावात घडलेल्या घटनांची माहिती पोलिसांना देणे आदी कामे पोलीस पाटील करतात. पोलीस पाटील हे गाव पातळीवर महसूल व पोलीस यांच्यासाठी महत्त्वाचे असतात. परंतु, शासनाच्या दुर्लक्षामुळे हे पद मागील पाच ते सहा वर्षांपासून रिक्त आहे. जाफराबाद तालुक्यातील ७४ गावे पोलीस पाटालाविना आहेत. जाफराबाद व टेंभुर्णी या दोन पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. जाफराबाद पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ६५ पैकी १८, तर टेंभुर्णी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ४३ गावांपैकी केवळ ९ गावांत पोलीस पाटील कार्यरत आहेत. पोलीस पाटलांची पदे रिक्त असल्याने गावगाडा चालविताना जिकिरीचे झाले आहे. केवळ मानधन तत्त्वावर असलेली ही पदे शासन का भरत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक पाहता, पोलीस आणि महसूल यांच्यामधील दुवा म्हणून पोलीस पाटील काम करत असतात. संकटकाळात गावातील गोपनीय आणि सत्य माहिती पोलीस पाटील देत असतो. त्यामुळे गाव पातळीवर पोलीस पाटीलपद किती महत्त्वाचे आहे हे दिसून येते.
पोलीस पाटलाचा पदभारही दुसऱ्याकडे देण्यात आला नाही. काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची माहिती पोलिसांपर्यंत वेळेत पोहोचत नाही. मध्यंतरी पोलीस पाटीलपद भरण्याची प्रक्रिया न्यायालयात अडकली होती. परंतु, न्यायालयाने यावरील बंदी उठवली तरीसुद्धा ही पदे भरण्याबाबत कुठलीच प्रक्रिया शासनाकडून राबविण्यात आली नाही. शासनाने तातडीने पोलीस पाटलांची पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.