‘समृद्धी’ महामार्गासाठी ७५ टक्के भूसंपादन पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:22 AM2018-05-11T01:22:57+5:302018-05-11T01:22:57+5:30
बदनापूर तालुक्यात नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी ७५ टक्के जमीन संपादन झाले आहे. फेरमूल्यांकन व न्यायालयीन प्रकरणांमुळे ४२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन अद्याप अपूर्ण असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : तालुक्यात नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी ७५ टक्के जमीन संपादन झाले आहे. फेरमूल्यांकन व न्यायालयीन प्रकरणांमुळे ४२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन अद्याप अपूर्ण असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तालुक्यातील गेवराई बाजार, दुधनवाडी, सोमठाणा, गोकुळवाडी, अकोला निकळक, भराडखेडा, नजीकपांगरी, केळीगव्हाण, खादगाव या दहा गावांमधून समृद्धी महामार्ग जात आहे. यासाठी तालुक्यात एकूण १६० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. दहा गावांमध्ये आतापर्यंत एकूण ११८ हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर ४२ हेक्टर जमिनीचे संपादन बाकी आहे. परंतु अंतिम टप्प्यात जमीन संपादनाच्या कामाची गती मंदावल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बोर, विहीर, पाईपलाईन, विविध झाडे आदींची नोंद संयुक्त मोजणीत घेतलेली नसल्याची तक्रार केली आहे. तर काहींच्या गटांची नोंद घेताना अदलाबदल झाले आहेत. बागायती जमिनी हंगामी बागायत दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संयुक्त मोजणीचे काम परत करण्याची मागणी बाधित शेतक-यांनी केली आहे.
काही शेतक-यांच्या जमिनीचे न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत. अशा सुमारे १०० ते ११० शेतक-यांच्या जमिनीचे संपादन अद्याप अपूर्ण आहे.