सहा सिंचन प्रकल्पांसाठी मिळणार ७७५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:52 AM2018-04-30T00:52:52+5:302018-04-30T00:52:52+5:30

पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत जालना जिल्ह्यातील सहा लघू प्रकल्पांना मंजुरी मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यांमध्ये ४८.६८ टक्के एवढी वाढ होणार असून, या पाण्याच्या माध्यमातून जवळपास ५ हजार २८४ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

775 crores for six irrigation projects | सहा सिंचन प्रकल्पांसाठी मिळणार ७७५ कोटी

सहा सिंचन प्रकल्पांसाठी मिळणार ७७५ कोटी

Next

संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत जालना जिल्ह्यातील सहा लघू प्रकल्पांना मंजुरी मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यांमध्ये ४८.६८ टक्के एवढी वाढ होणार असून, या पाण्याच्या माध्यमातून जवळपास ५ हजार २८४ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
दोन महिन्यापूर्वी लघू पाटबंधारे विभागाच्या येथील विभागाने पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत हे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविले होते. या संदर्भात नुकतीच दिल्ली येथे बैठक होऊन विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागातील ८३ लघू सिंचन प्रकल्प पूर्ण करण्या संदर्भात केंद्र सरकारचे अर्थसाह्य मिळणार आहे. केंद्र सरकारतर्फे आर्थिक मदत देण्यासाठी केंद्रीय जलसंपदा, नदीविकास योजनेतून या प्रकल्पांना निधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास १४ जिल्ह्यांना याचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.
भोकरदन तालुक्यातील पळसखेडा प्रकल्पासाठी १७२८.८६ लाख रुपयांचा निधी मिळू शकतो. यातून ७.८३ द.ल.घ.मि. एवढे पाणी या प्रकल्पामध्ये साठविता येणार असून, त्यातून ५७० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. मंठा तालुक्यातील पाटोदा येथील प्रकल्पासाठी ८४.७५ लाख रुपये मिळणार असून, यातून ८.६०७ द.ल.घ.मी. साठवण क्षमता निर्माण होणार असून, जवळपास ११०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. खोराड सावंगी या प्रकल्पासाठी १५१८.२१ लाख रुपये मिळणार असून, यातून २.५५ द.ल.घ.मी. पाणासाठा निर्माण होईल.
या पाणीसाठ्याच्या माध्यमातून २५४ हेक्टर जमिनी ओलिताखाली येणार आहे. जालना तालुक्यातील हातवन लघू प्रकल्प पूर्णत्वासाठी ३७३१७.१७ लाख रुपयांचा निधी अपेक्षित असून, यामध्ये १५.०३ द.ल.घी. साठवण क्षमता निर्माण होईल. या माध्यमातून परिसरातील जवळपास १६७५ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. जाफराबाद तालुक्यातील बरबडा प्रकल्पासाठी १९७७६.८५ लाख रुपयांचा निधी अपेक्षित असून, या माध्यमातून ११.६ द.ल.घ.मी. पाणी साठणार आहे. यातून १२२५ हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते. जाफराबाद तालुक्यातील सोमखेडा येथील प्रकल्पासाठी ३८४९ कोटी रुपये अपेक्षित असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास ३.६२ द.ल.घ.मी. पाणीसाठा निर्माण होईल, त्यातून ४४५ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. आता ही कामे किती लवकर सुरू होतात, याकडे लक्ष आहे.
सध्या जालना जिल्हा हे राजकीय दृष्ट्या महत्वाचे केंद्र बनले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे असून,बबनराव लोणीकरांच्या रूपाने एक कॅबिनेट मंत्री तर अर्जुन खोतकऱ्यांच्या रूपाने एक राज्यमंत्री अशी सत्ता केंद्र असल्याने या प्रकल्पांना गती मिळेल.

Web Title: 775 crores for six irrigation projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.