७८ हजार शेतकरी आधार प्रमाणीकरणापासून दूर; औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक १० हजार शेतकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 08:14 AM2021-11-11T08:14:00+5:302021-11-11T08:14:17+5:30
कर्जमुक्ती योजना
- विजय मुंडे
जालना : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी १५ नोव्हेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. अंतिम मुदतीचे चार दिवस शिल्लक असतानाही अद्याप ७८ हजारांवर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. निर्धारित वेळेत आधार प्रमाणीकरण न करणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची भीती आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वाधिक १० हजार शेतकरी हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत.
कोरोनामुळे रखडलेली कर्जमुक्ती योजना पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर विशिष्ट क्रमांकासह नावे आलेली असतानाही असंख्य शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. अशा शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्यासाठी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविली जात आहे.
या योजनेची अंतिम मुदत चार दिवसांवर आलेली असताना राज्यभरातील तब्बल ७८ हजारांवर शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही. हे प्रमाणीकरण केले नाही, तर लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे. मयत लाभार्थी शेतकऱ्यांच्या वारसांनीही निर्धारित वेळेत बँकांकडे कागदपत्रे दाखल करून योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे.
...तर ४११ कोटींचे नुकसान
शेतकऱ्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण वेळेत केले नाही. तर त्यांचे ४११ काेटी रुपयांचे कर्ज माफ होणार नाही. किंबहुना यात त्यांचे मोठे नुकसान होणार आहे.