कोरोनात मोतीबिंदूच्या ७८९ शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:32 AM2021-01-25T04:32:20+5:302021-01-25T04:32:20+5:30
जालना : कोरोनामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया रखडल्याने काचबिंदू होण्याचा धोका वाढला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शासकीय रुग्णालयात नोंदणी ...
जालना : कोरोनामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया रखडल्याने काचबिंदू होण्याचा धोका वाढला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शासकीय रुग्णालयात नोंदणी असलेल्या वयोवृद्धांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या होत्या. आजवर गणपती नेत्रालयात तब्बल ७२१ जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय अधंत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वयोवृद्ध नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातात. जिल्हा रुग्णालयाच्यावतीने या शस्त्रक्रिया होत असल्याने वयोवृद्धांना मोठा दिलासा मिळत आहे. परंतु, कोरोनामुळे मार्च-२०२० पासून या शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. वेळेवर शस्त्रक्रिया होत नसल्याने मोतीबिंदू अधिक पिकलेला असलेल्या वयोवृद्धांना काचबिंदू होण्याचा धोका निर्माण झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने शहरातील गणपती नेत्र रुग्णालयात नोंदणीकृत वयोवृद्धांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या होत्या. आजवर एकूण ७८९ जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या वतीने आयोजित नेत्र तपासणीतील १२१ जणांनाही याचा लाभ मिळाला आहे. या शस्त्रक्रियांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॅ. ऋषीकेश नायगावकर, डॉ. उदयन परितकर, जिल्हा नोडल अधिकारी डॉ. संजय साळवे आदींनी परिश्रम घेतले.
तालुकानिहाय झालेल्या शस्त्रक्रिया
जालना १३२
बदनापूर- ९०
परतूर- ९५
घनसावंगी ९२
जाफराबाद ८२
भोकरदन १०४
मंठा ९२
अंबड १०२
शस्त्रक्रिया सुरू राहणार
जिल्हा रुग्णालयांतर्गत नोंदणी केलेल्या वयोवृद्ध नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू ठेवल्या जाणार आहेत. गरजूंच्या अधिकाधिक लवकर शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
डॉ. संजय साळवे
जिल्हा नोडल अधिकारी