जालन्यात तीन दिवसांत ७.९ मिलिमीटर पाऊस; वीज पडून २३ जनावरांसह १३८ कोंबड्यांचा मृत्यू
By दिपक ढोले | Published: April 28, 2023 06:14 PM2023-04-28T18:14:34+5:302023-04-28T18:16:31+5:30
पावसाबरोबरच विजांचा कडकडाटही होत आहे. वीज पडून मनुष्यहानी झाली नसली तरीही जनावरांचा मृत्यू झाला आहे.
जालना : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. त्यातच २५ ते २७ एप्रिलदरम्यान पावसाचा जोर वाढला असून, जवळपास ७.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसाचा फटका १०१ गावांना बसला असून, २ हजार १६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. वीज पडून २३ जनावरांसह १३८ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.
सध्या उन्हाळा सुरू आहे. असे असतानाही अवकाळी पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी तर गारपीट झाली आहे. पावसाबरोबरच विजांचा कडकडाटही होत आहे. वीज पडून मनुष्यहानी झाली नसली तरीही जनावरांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होत आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात ७.९ मिलीमीटर पाऊस झाला. यात सर्वाधिक पाऊस हा जालना तालुक्यात झाला आहे. जालना तालुक्यात १४.३० मिलीमीटर, घनसावंगीत ९.१० तर अंबड तालुक्यात ७.४० मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसाचा फटका १०१ गावांना बसला असून, ३ हजार ३३२ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यात ४५ हेक्टरवरील जिरायती पिकांचे, १ हजार ६९३ हेक्टरवरील बागायती पिकांचे तर २७७ हेक्टवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.