८६ तलावांचा ‘पाझर’ थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:22 AM2019-07-22T00:22:34+5:302019-07-22T00:26:11+5:30

जिल्ह्यातील ८६ पाझर तलावांची अवस्था बिकट झाली असून, दुरूस्तीअभावी पावसाचे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

86 pus lakes leakage is not stopping | ८६ तलावांचा ‘पाझर’ थांबेना

८६ तलावांचा ‘पाझर’ थांबेना

Next

दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने जलसंधारणाची अनेक कामे हाती घेतली आहेत. मात्र, जिल्ह्यातील ८६ पाझर तलावांची अवस्था बिकट झाली असून, दुरूस्तीअभावी पावसाचे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या तलावांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला ७ कोटी ९८ लाखांचा निधी उपलब्ध होत नाही. परिणामी जिल्ह्यातील ८६ तलावांना फुटलेला ‘पाझर’ आजही कायम असून, पावसाचा थेंब-थेंब अडविण्याचे शासनाचे स्वप्न कागदावरच राहत आहे.
दुष्काळ जिल्ह्याच्या पाचवीला पुजला असून, टंचाई निवारणार्थ शेकडो टँकर, तात्पुरत्या नळ योजनांसह इतर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. घागरभर पाण्यासाठी ग्रामीण भागातील महिला, मुलांसह वयोवृध्दांनाही शेतशिवारात भटकंती करावी लागते. दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक कामेही केली जात आहेत. मात्र, जिल्ह्यातील पाझर तलाव, लघू-मध्यम प्रकल्पांच्या दुरूस्तीकडे मात्र, फासरे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाणी, शेतातील जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत वाढ व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाट बंधारे विभागांतर्गत जिल्ह्यात ५१२ पाझर तलाव बांधण्यात आले आहेत. या तलावाची साठवण क्षमता १ लाख ६१ हजार २४९ द. ल. घ. मी आहे. तर सिंचन क्षमता १३ हजार ४७३ हेक्टर आहे. या तलावांमुळेच जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न मिटू शकतो. परंतु, यातील काही तलावांची दुरुस्ती न झाल्यामुळे या तलावांमध्ये पाणीच राहत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील ८६ पाझर तलाव नादुरुस्त आहेत. जालना तालुक्यातील १५, बदनापूर १०, अंबड ८, घनसावंगी ५, परतूर ७, मंठा १५, भोकरदन १८, जाफराबाद तालुक्यातील ८ तलाव नादुरुस्त आहे. यांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी रुपयांची गरज आहे. यात जालना तालुक्यातील तलावासाठी १ कोटी ५५ लाख, बदनापूर तालुक्यातील तलावासाठी ८० लाख, अंबड तालुक्यातील तलावासाठी ७० लाख, घनसावंगी तालुक्यातील तलावासाठी ४८ लाख, परतूर तालुक्यातील तलावासाठी ५० लाख, मंठा तालुक्यातील तलावासाठी १ कोटी ५० लाख, भोकरदन तालुक्यातील तलावासाठी १ कोटी ७० लाख, जाफराबाद तालुक्यातील ७५ लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. मात्र, निधी उपलब्ध होत नसल्याने या पाझर तलावांची दुरूस्ती होत नाही. परिणामी प्रत्येक वर्षी पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जात आहे. पाझर तलावासह इतर प्रकल्पांच्या दुरूस्तीबाबत अशीच परिस्थिती राहिली तर दुष्काळावर मात होणार कशी ? असाच प्रश्न शेतकरी, सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. दरम्यान, याबाबत लघु पाट बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
साडेतीन कोटींचा खर्च : मागील वर्षी ४७ पाझर तलावांची दुरुस्ती
जलयुक्त शिवार योजनेतंर्गत सन २०१८-१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने ४७ पाझर तलावांची दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती लघु पाट बंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. यात जालना तालुक्यातील ६, बदनापूर ७, परतूर २, मंठा १२, भोकरदन १३, जाफराबाद तालुक्यातील ७ तलावांची दुरुस्ती करण्यात आली आहे. यासाठी ३ कोटी ६० लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.

Web Title: 86 pus lakes leakage is not stopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.