जालना रेल्वे स्थानकातील २७ लाखाच्या लुटी प्रकरणी ९ संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 04:07 PM2018-10-27T16:07:53+5:302018-10-27T16:10:14+5:30
हत्याराचा धाक दाखवून मुंबईच्या व्यापाऱ्याची २७ लाख रूपयांची बॅग लंपास लुटले होते.
जालना : मुंबई येथील व्यापारी विनोदकुमार श्रीकमल महंतो या तरुण व्यापाऱ्याच्या मानेला सुरा लावून २७ लाख रुपये असलेली बँग चोरट्यांनी शुक्रवारी रात्री लंपास केली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ९ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
विनोदकुमार महंतो यांनी लातूर, नांदेड, परभणी आणि जालना येथील व्यापाऱ्यांकडे जाऊन वही व्यवसायातील वसुलीची रक्कम जमा केली होती. जवळपास २७ लाख रुपये घेऊन मुंबईला जाण्यासाठी ते जालना रेल्वेस्थानकावर आले होते. फलाट क्रंमाक दोनवर विनोदकुमार हे आणखी एका सोबत उभे होते. यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना चाकूचा दाखवून त्यांच्याकडील बॅग हुसकावून नेली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे यशवंत जाधव व रेल्वे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला. मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने नऊ संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.