जालना जिल्ह्यात नऊशे कोटींची कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:56 AM2018-01-05T00:56:16+5:302018-01-05T00:56:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार ६८४ शेतक-यांना ९१० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार ६८४ शेतक-यांना ९१० कोटी ३१ लाख रुपयांची कर्जमाफी दिल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी गुरुवारी दिली.
वर्षभरात सिद्धी २०१७, संकल्प २०१८ या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कामांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोकणी, उपजिल्हा निबंधक (सहकारी संस्था) आघाव, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी रवींद्र पडूळकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. दोन वर्षात अभियानांतर्गत ३९८ गावांची या अभियानात निवड करण्यात येऊन ३६९ गावे जलयुक्त करण्यात आली आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत परतूर तालुक्यातील आष्टीसह १६ गावांचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे.
परतूर तालुक्यातील आष्टीसह अकोली, आनंदगाव, ब्राह्मणवाडी, सुरुमगाव, ढोकमाळ तांडा, फुलेवाडी, पळशी, हास्तूरतांडा, लिखित पिंप्री, लोणी खुर्द, कनकवाडी, परतवाडी रायगव्हाण, सातारा वाहेगाव व वाहेगाव सातारा या गावांचा श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, जिल्हा माहिती अधिकारी एस. के. बावस्कर यांची या वेळी उपस्थिती होती.