जिल्ह्यात हजार मुलांमागे ९०७ मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:40 AM2020-12-30T04:40:52+5:302020-12-30T04:40:52+5:30

जालना : स्त्री जन्माविषयी झालेली जनजागृती, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, माझी कन्या भाग्यश्री योजनेची अंमलबजावणी, गरोदर ...

907 girls for every 1000 boys in the district | जिल्ह्यात हजार मुलांमागे ९०७ मुली

जिल्ह्यात हजार मुलांमागे ९०७ मुली

Next

जालना : स्त्री जन्माविषयी झालेली जनजागृती, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, माझी कन्या भाग्यश्री योजनेची अंमलबजावणी, गरोदर मातांना झालेले समुपदेशन आदी विविध कारणांमुळे जिल्ह्यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मुलींच्या जन्मदराचे प्रमाण अत्यल्प वाढले आहेत. यावर्षी एक हजार मुलांमागे ९०७ मुली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

जालना जिल्हा हा गेल्या काही वर्षांपूर्वी शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील मुलींच्या प्रमाणात मागे पडला होता. त्यातच जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्या उघड झाल्या. २०१५-१६ साली १ हजार मुलांमागे केवळ ८८७ मुली होत्या. त्यानंतर जिल्ह्यात स्त्री जन्मदर वाढावा यासाठी विभागीय स्तरावर लेक वाचवा, राष्ट्र वाचवा अभियान राबवून मोठी जनजागृती केली. या विषयावर अधिक लक्ष केंद्रित करून विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी आरोग्य विभाग आणि महिला बालविकास विभागाने प्रभावीपणे केली. महिला बचतगटांच्या माध्यमातून स्त्री जन्माविषयी जनजागृती, प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलीच्या जन्माचे स्वागत, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे महत्त्व ग्रामसभेत सांगणे, सर्व शाळांमध्ये मुलींसाठी शौचालये, सावित्रीबाई फुले कन्या पारितोषिक योजना, माझी कन्या भाग्यश्री योजनेची यशस्वी अंमलबजावणी आदी कारणांमुळे जिल्ह्यात मुलींची संख्या वाढण्यास मोठी मदत झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी सांगितले.

महिलांसाठी आरोग्यसेवा

गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत महिला आरोग्य केंद्राला भेट देतात. त्याऐनंतर त्यांना तपासणीसाठी जालना शहरातील शासकीय महिला रूग्णालयात पाठविले जाते. महिलांनाही गरोदपणात तीन वेळा लसीकरण केले जाते.

मुलांचे लसीकरण

राष्ट्रीय कौटुंबिक अहवालानुसार, १२ ते २३ महिने वयोगटातील मुलांना आवश्यक असणारे लसीकरण पूर्णपणे दिले गेलेले आहे. त्याची टक्केवारी गत अहवालाच्या तुलनेत घटली आहे. मुलांना अगंणवाडीत हे लसीकरण करण्यात येत आहे.

जिल्ह्यात मागील काही वर्षांपूर्वी मुलींचे प्रमाण कमी झाले होते. यानंतर आम्ही गावागावात जनजागृती केली. २०१५-१६ एक हजार मुलांमागे केवळ ८८७ मुली होत्या. यात मागील काही वर्षांपासून वाढ झाली आहे. यंदा एक हजार मुलांमागे ९०७ मुली आहेत.

- विवेक खतगावकर,

जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: 907 girls for every 1000 boys in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.