राज्यातील ९५ टक्के बेड रिकामे, सर्व बाबींच्या अभ्यासानंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय : राजेश टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 12:23 PM2022-01-24T12:23:35+5:302022-01-24T12:25:01+5:30
युरोप खंडात कोरोनाची लाट सुरू आहे. असे असले तरी तेथील शाळा सुरू आहेत.
जालना : युरोप खंडामध्ये कोरोनाची लाट सुरू असताना शाळाही सुरू आहेत. राज्यभरातील रुग्णालयांमधील ९० ते ९५ टक्के बेड रिकामे असून, हॉस्पिटलायझेशनही कमी आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करूनच शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेत कोविडचे सर्व नियम पाळले जाणार असून, पालकांनीही मुलांना शाळेत पाठवावे, योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी जालना येथील एका कार्यक्रमात केले.
शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी पालक मुलांना शाळेत पाठविण्यास विरोध करीत असल्याबाबत टोपे यांना विचारणा करण्यात आली होती. टोपे म्हणाले, युरोप खंडात कोरोनाची लाट सुरू आहे. असे असले तरी तेथील शाळा सुरू आहेत. शाळा सातत्याने बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांचा बौद्धिक व सर्वांगीण विकास करण्याचा हा प्रमुख कालावधी असतो. यातच मुलांना घरी ठेवले तर त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने सर्व बाबींचा विचार करून घेतलेला आहे. ज्या जिल्ह्यात अधिक बाधित रुग्ण असतील तेथील स्थानिक प्रशासन व पालकमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावयाचा आहे.
शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या आरोग्याकडे लक्ष ठेवण्याबाबत सूचित केले आहे. कोणी कोरोनाबाधित आढळले तर इतरांची तपासणी करून योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. सध्या राज्यातील ९० ते ९५ टक्के बेड रिकामे आहेत. आयसीयू किंवा ऑक्सिजन बेड हे ९५ टक्के रिकामे आहेत. ९० टक्के बाधित होम आयसोलेशनमध्ये आहेत. टास्क फोर्सचाही विचार याबाबत घेण्यात आला आहे. हॉस्पिटलायझेशनचे प्रमाण कमी राहिले तर सध्या लागू असलेले निर्बंधही मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कमी करता येऊ शकतील, असे सांगतानाच राज्यातील नागरिकांनी वेळेत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.