'मला जगायचा कंटाळा आलाय', सुसाईड नोट लिहून २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या
By दिपक ढोले | Published: May 19, 2023 04:34 PM2023-05-19T16:34:20+5:302023-05-19T16:40:02+5:30
तरुणाची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्याचे आई-वडील बाहेरगावी शेतमजूर म्हणून काम करतात.
परतूर : मला जगायचा कंटाळ आलाय, म्हणून मी आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी लिहून परतूर तालुक्यातील शिंगोना येथील एका २५ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. अनिल यादवराव कांबळे (२५) असे मयत तरूणाचे नाव आहे.
अनिल कांबळे या तरुणाची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्याचे आई-वडील बाहेरगावी शेतमजूर म्हणून काम करतात. अविवाहित असलेला अनिल कांबळे हा गावातीलच मामाकडे राहतो. मामाने त्याला ऑटोरिक्षा खरेदी करून दिली होती. ही ऑटोरिक्षा चालवून तो आपला उदरनिर्वाह चालवित होता. गेल्या काही दिवसांपासून मनस्थिती ठीक नसलेल्या अनिल कांबळे याने गुरूवारी दुपारी राहत्या घरात स्वतःला बंद करून घेत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून, त्यात मला जगायचा कंटाळा आलाय, म्हणून मी आत्महत्या करतोय, असा मजकूर लिहिलेला आहे. गावात राहणाऱ्या मामा-मामींकडेच त्याचे सर्व बालपण आणि मोठेपण गेले होते. अत्यंत मेहनती व गरीब असलेल्या या तरुणाने आत्महत्या केल्याने शिंगोना ग्रामस्थ हळहळ व्यक्त करीत आहेत. घटनेची माहिती कळताच परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अशोक गाढवे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह परतूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. रात्री उशिरा शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.