जरांगेंना 'या' मंत्र्यांचा फोन, पण..; "एक घंटा वाढवून देणार नाही, दिवस संपला, विषय संपला"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 02:12 PM2023-10-24T14:12:03+5:302023-10-24T14:13:20+5:30
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आज आणि उद्यापर्यंत मुख्यमंत्री जाहीर करतील, एकनाथ शिंदे शब्दाला पक्के आहेत.
मुंबई - मराठा समाजासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे- पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज मंगळवार २४ ऑक्टोबरला संपत आहे. मात्र, अजुनही सरकारकडून मराठाआरक्षणासंदर्भात कोणतीच घोषणा झालेली नाही. आजचा दिवस शेवटचा असणार आहे. आज आरक्षण जाहीर केले नाहीतर पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात आता मनोज जरांगे पाटील यांनी पुढचं आंदोलन कसे असणार, याची माहिती दिली होती. आता, त्यांनी कुठल्याही परिस्थितीत सरकारला वेळ वाढवून दिला जाणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आज आणि उद्यापर्यंत मुख्यमंत्री जाहीर करतील, एकनाथ शिंदे शब्दाला पक्के आहेत. आज किंवा उद्या कोणतीही घोषणा झाली नाहीतर तर २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू होणार. नेत्यांनी आमच्या गावात यायच नाही, आम्ही तुमच्याकडे येत नाही, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही. गावागावात, शहरात जनजागृती होणार, हे सर्व आंदोलन शांततेत होणार पण त्यांना पेलणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी मंत्री गिरीश महाजन फोन आला होता. मात्र, जरांगे पाटील यांच्याकडे फोन नसल्याने त्यांचं बोलणं झालं नाही. आज दिवसभर आणि रात्रीपर्यंत सरकारकडे वेळ आहे, त्यांना जे काही करता येईल ते त्यांनी करावं. त्यानंतर, त्यांच्याकडे वेळ नाही, पुन्हा आमच्या दारात यायचं नाही, यायचं तर आरक्षणच घेऊन यायचं, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. आरक्षण देणार असतील तर आम्ही बोलू, आरक्षण देणार नसतील तर नाही बोलणार. एक घंटा वेळ वाढवून मिळणार नाही, तो विषय उद्यापासून संपला, आजचा दिवस आणि रात्री एवढा वेळ त्यांचा आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, सरकारकडून वेळ वाढवून मागितला जाणार असल्यास आम्ही १ घंटाही वेळ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री तुमच्या शब्दाला फार किंमत आहे, तुम्ही शब्द पाळणारे म्हणून समाजात तुम्हाला मानलं जातं. त्यामुळे, शब्दाला जागून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आज संध्याकाळपर्यंत आरक्षण दिलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पदापेक्षा शब्दाला जास्त किंमत द्यावी, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
चौंडीत धनगर समाजाच्या मेळाव्याला
उद्यापासून माझं उपोषण सुरू होत आहे. तत्पूर्वी आज मी चौंडी येथे जाऊन धनगर समाज बांधवांची भेट घेणार आहे. धनगर समाज बांधवांना भेटून मला लगेच परत यायचं आहे. कारण, उद्यापासून उपोषण सुरू होणार आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.