विनापरवाना खताची विक्री करणाऱ्या तिघांविरुध्द गुन्हा दाखल
By दिपक ढोले | Published: June 15, 2023 07:01 PM2023-06-15T19:01:02+5:302023-06-15T19:01:19+5:30
कृषी विभागाच्या पथकाने पाहणी केली असता, त्यातील १०-०५-१० या खतास राज्यामध्ये उत्पादन व विक्री परवाना नसल्याचे आढळून आले.
जालना : राज्यात परवाना नसलेल्या खतांचा मोठा साठा कृषी विभागाने बुधवारी पकडला आहे. या प्रकरणी नवभारत फर्टिलायझर्स कंपनीचे मालक हरीष बाबू, एन. श्रीनिवास राव, उमेश नारायण गजभार या संशयितांविरुध्द परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परतूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक रूस्तुम बोनगे, तालुका कृषी अधिकारी सखाराम पवळ यांनी परतूर -आष्टी रोडवरील खांडवी वाडी फाटा येथे गाडी क्रमांक (एमएच ०९-क्यू४३५४) ला थांबविले. ही गाडी माजलगावहून वाटूरकडे जात होती. गाडीचालकाकडे चालानबाबत विचारपूस केली. शिवाय, गाडीमधील मालाची पाहणी केली असता, त्यामध्ये नवभारत फर्टिलायझर्स लिमिटेड, हैदराबाद या कंपनीच्या ७ हजार १४८ रुपये किमतीच्या ४० किलो वजनाच्या ६ बॅग, ऑर्गनिक मन्यूर विजया गोर्मीनच्या ७७ हजार ९२२ रुपये किमतीच्या ७८ बॅग, अन्य खतांच्या २१ हजार ५८२ रुपये किमतीच्या १८ बॅग आढळून आल्या. चालक शेख आयुब शेख जहूर यांनी सदरील खत नवभारत कंपनीचे असून, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील विलास कदम यांच्या गोदामातून भरल्याचे सांगितले. विलास कदम यांच्याशी संपर्क करून सदरील खताच्या परवान्याबाबत विचारणा केली. त्यांनी नवभारत कंपनीला राज्यात असलेला परवाना मोबाइलवरून उपलब्ध करून दिला.
कृषी विभागाच्या पथकाने पाहणी केली असता, त्यातील १०-०५-१० या खतास राज्यामध्ये उत्पादन व विक्री परवाना नसल्याचे आढळून आले. तिन्ही खतांचे नमुने घेऊन विक्रीसाठी पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी खत निरीक्षक रूस्तुम बोनगे यांच्या फिर्यादीवरून संशयित नवभारत फर्टिलायझर्स कंपनीचे मालक हरीष बाबू (रा. हैदराबाद), एन. श्रीनिवास राव (रा. हैदराबाद), उमेश नारायण गजभार (रा. मंगरूळपीर, जि. वाशिम) या संशयितांविरुध्द परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक आर. टी. जाधव, जिल्हा कृषी अधीक्षक जी. आर. कापसे, विभागीय गुण नियंत्रण आशिष काळुशे, कृषी विकास अधिकारी सुधाकर कराड, नीलेश भदाने, विशाल गायकवाड, सखाराम पवळ, रूस्तुम बोनगे यांनी केली आहे.