आई- वडील आरती करीत असताना हौदात पडून चिमुकल्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 09:09 PM2023-07-09T21:09:01+5:302023-07-09T21:09:23+5:30
गणेश विसर्जनासाठी तयार केला होता हौद
भोकरदन (जि.जालना) : आई -वडील आरती करण्यात मग्न असतानाच हौदात पडून ४ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भोकरदन येथे घडली. उदयन भाऊसाहेब लहाने असे चिमुकल्याचे नाव आहे.
रविवारी शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात आरती होते. त्यासाठी पोलिस कर्मचारी भाऊसाहेब लहाने, त्यांची पत्नी व मुलगा उदयन लहाने हे स्वामी समर्थ केंद्रात गेले होते. दर्शन घेऊन ते आरतीसाठी उभे राहिले. त्या दरम्यान मुलगा उदयन हा खेळत बाहेर आला. जवळच असलेल्या हौदात तो पडला.
मुलगा कुठे गेला म्हणून ते पाहण्यासाठी गेले असता, त्यांना तो हौदात पडलेला दिसला. त्याला तात्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चिमुकल्यावर जाफराबाद तालुक्यातील काळेगाव येथे रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
गणेश विसर्जनासाठी तयार केला होता हौद
भोकरदन येथील नगरपरिषदेने गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरात हौद तयार केला आहे. या हौदावर जाळी टाकण्यात आलेली नाही. या हौदातील गाळही नगरपरिषदेने काढलेला नाही. हौदावर जाळी नसल्यामुळे ही दुदैवी घटना घडल्याचे लोकांनी सांगितले. तातडीने या हौदावर जाळी बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.