उच्चशिक्षित शेतकऱ्याची वेगळी वाट; जिरेनियम शेतीतून कमावतोय एकरी दोन लाख
By विजय मुंडे | Published: August 14, 2023 06:55 PM2023-08-14T18:55:26+5:302023-08-14T18:55:51+5:30
सुगंधी तेलासाठी जिरेनियमचा वापर, मुंबईतील कंपनी शेतातून नेते सुगंधी तेल
- अशोक डोरले
अंबड : मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन सेट-नेट परीक्षेत यश मिळविलेले गोंदी (ता. अंबड) येथील शेतकरी शिवाजी जगन्नाथ गायके हे सुगंधी तेल उत्पादनासाठी लागणाऱ्या जिरेनियमची शेती करत आहेत. याद्वारे एका एकरातून त्यांना वार्षिक दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळत आहे.
शिवाजी गायके यांची गोंदी शिवारात वडिलोपार्जित शेती आहे. शिवाजी गायके हे उच्च शिक्षण घेऊन नॉन ग्रॅन्ट कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करत आहेत. नोकरी करताना त्यांना जिरेनियम शेतीची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या हवामानात वाढणारी बहुवार्षिक, झुडुपवर्गीय सुगंधी वनस्पती तीन एकरात लागवड केली आहे. लागवडीपूर्वी त्यांनी जमिनीत एकरी १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत (कंपोस्ट खत) टाकले. तसेच प्रति एकर ५० किलो युरिया, १५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २६ किलो पोटॅश म्युरेट, १५ किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि १० किलो झिंक सल्फेट खतांची मात्रा दिली. जिरेनियम वनस्पतीचे आयुष्य तीन वर्षांचे आहे. त्यामुळे दरवर्षी वरीलप्रमाणे खतांची मात्रा त्यांनी दिली. सुगंधित वनस्पती असल्याने किडीचा अजिबात त्रास होत नाही. जनावरेही याला तोंड लावत नाहीत. यामुळे संरक्षणासाठी स्वतंत्र खर्च करावा लागला नसल्याचे शिवाजी गायके सांगतात. या शेतीतून त्यांना वार्षिक दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
वर्षाला होतात चार कापण्या
दर तीन महिन्यांनी पानांची कापणी केली जाते. अशा वर्षातून चार कापण्या होतात. एका तोडणीला खर्च वजा जाता ५० हजारांचे उत्पन्न मिळते. तोडणीनंतर शेतातील प्लॅंटवर पानांतून तेल काढले जाते. या निघणाऱ्या सुगंधी तेलाला प्रति किलो ८ हजारांचा भाव आहे. यापूर्वी तो दर १२ हजार रुपये होता. मुंबईतील एक कंपनी हे तेल खरेदी करते.
चांगले उत्पन्न मिळते
योग्य नियोजन करून जिरेनियमची शेती केल्यास वार्षिक एकरी दोन ते अडीच लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. किडीचे आणि जनावरांपासून संरक्षणाचे टेन्शन नाही. शिवाय या वनस्पतीला मागणी असल्यामुळे चांगल्या उत्पन्नासाठी या पिकाकडे पाहता येईल.
- शिवाजी गायके, प्रगतशील शेतकरी