जालना जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
By दिपक ढोले | Published: October 19, 2023 06:16 PM2023-10-19T18:16:40+5:302023-10-19T18:16:54+5:30
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळला
जालना : जिल्हा उपनिबंधकांकडे केलेल्या तक्रारीचा निपटारा होत नसल्याने मंठा तालुक्यातील पाटोदा येथील एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गुरूवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तात्काळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळाला.
मंठा तालुक्यातील पाटोदा येथील भगवान नागोराव काळे यांनी एका सावकाराकडून एक लाखाचे कर्ज घेतले होते. त्यांनी सावकाराला शेती लिहून दिली होती. काळे यांनी त्या सावकाराला पैसे देखील परत केले होते. परंतु, सावकाराने त्यांची जमीन स्वत: च्या नावावर केली. याबाबत काळे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीचा निपटारा न झाल्याने गुरूवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ते जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आले. त्यांच्या हातात विषारी द्रव्याच्या दोन बॉटल होत्या. माझ्या तक्रारीचा निपटारा का केला नाही असे म्हणून त्यांनी विषारी द्रव हाताला घेवून तोंडाला लावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील शिपाई कल्याण लांडगे यांनी त्यांच्या हातातून बॉटल हिसकावून घेतली. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी जिल्हा उपनिबंधक परमेश्वर वरखडे यांच्या फिर्यादीवरून भगवान काळे यांच्या विरुध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.