बोरी येथे चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री दोन घरे फोडली, सात लाखांचा मुद्देमाल लंपास
By दिपक ढोले | Published: September 5, 2022 05:13 PM2022-09-05T17:13:18+5:302022-09-05T17:13:38+5:30
, परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जालना : दोन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने, असा सुमारे सात लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना अंबड तालुक्यातील बोरी येथे रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या घटनेमध्ये शेतकरी नितीन गोवर्धन थोरात (२९) हे कुटुंबीयांसह घरात झोपलेले असताना चोरट्यांनी पाठीमागील घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. एका खोलीत ठेवलेला लोखंडी संदूक उचलून घराबाहेर नेऊन त्याचे कुलूप तोडून त्यामध्ये असलेले एक लाख ६३ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी नितीन थोरात यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना बोरी येथीलच दामोधर सर्जेराव भोरे यांच्या घरी झाली. भोरे कुटुंबीय शेजारच्या घरात झोपलेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील संदूक उचलून बाहेर नेत त्याचे कुलूप उघडले. संदुकात असलेले रोख ५० हजार रुपये व चार लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, असा एकूण पाच लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या घटनांमध्ये चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत सारखीच आहे. भोरे यांनीही अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. अंबड पोलिसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास उपनिरीक्षक योगेश चव्हाण व उपनिरीक्षक ढाकणे हे करीत आहेत.