दीड हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
By दिपक ढोले | Published: August 2, 2023 07:14 PM2023-08-02T19:14:43+5:302023-08-02T19:15:21+5:30
वारसा हक्काचा व वाटणीपत्रकाचा फेर घेण्यासाठी घेतली होती लाच
जालना : दीड हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी पाच वर्षांची सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. महेबुब अमीन मासुलदार (रा. तुकारामनगर, मंठा, जि. जालना) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
२ मे २०१६ रोजी फिर्यादी हा आरोपी ग्रामसेवक महेबुब अमीन मासुलदार याला ग्रामपंचायत अंभोरा शेळके (ता. मंठा) येथे कामानिमित्त भेटण्यासाठी गेला होता. फिर्यादीच्या वारसा हक्काचा फेर व वाटणीपत्रकाचा फेर घेण्यासाठी सदरील आरोपीने दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. फिर्यादीने आरोपीस ५०० रुपये दिले. उर्वरित एक हजार ५०० रुपये व कागदपत्र घेऊन ये, असे आरोपी ग्रामसेवकाने फिर्यादीस सांगितले. फिर्यादीने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीवरून ३ मे २०१६ रोजी सापळा लावला. यावेळी आरोपी महेबुब अमीन मासुलदार याने दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून १,५०० रुपयांची लाच स्वीकारली.
या प्रकरणी तत्कालीन उपअधीक्षक प्रवीण मोरे यांनी मंठा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, पंच साक्षीदार व पोलिस उपअधीक्षक प्रवीण मोरे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पुढे आलेल्या साक्षीपुराव्यावरून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश किशोर जयस्वाल यांनी मेहबुब अमीन मासुलदार याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ॲड. भारत खांडेकर यांनी काम पाहिले.