जुन्या टायरच्या गोडाऊनला भीषण आग; सहा लाखांचे टायर जळून खाक
By विजय मुंडे | Published: May 27, 2023 04:58 PM2023-05-27T16:58:50+5:302023-05-27T16:59:09+5:30
आग आटोक्यात येईपर्यंत आतील सहा लाख रुपयांचे टायर व इतर साहित्य जळून खाक झाले.
जालना : एका जुन्या टायरच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत सहा लाखांचे टायर जळून खाक झाले. ही घटना शनिवारी दुपारी शहरातील भवानीनगर भागात घडली असून, सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.
शहरातील भवानीनगर भागात अझरखान कैसर खान यांचे जुन्या टायरचे दुकान आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास या गोडाऊनला अचानक आग लागली. माजी नगरसेवक वाजेद खान यांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन वाहनांसह घटनास्थळी धाव घेतली. गोडाऊनमधील टायर जळाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यासाठी दोन ते अडीच तासांचे प्रयत्न करावे लागले.
आग आटोक्यात येईपर्यंत आतील सहा लाख रुपयांचे टायर व इतर साहित्य जळून खाक झाले. या आगीमुळे या भागात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली शिफ्ट इन्चार्ज संदीप दराडे, फायरमन नितेश ढाकणे, नागेश घुगे, सागर गडकारी, किशोर सकट, सादिक अली, वाहन चालक रवी तायडे, संजय हिरे यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.