धनगर आरक्षण अभ्यासासाठी नऊ जणांची समिती जाणार इतर राज्यात - गोपीचंद पडळकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 03:13 PM2023-11-25T15:13:56+5:302023-11-25T15:15:06+5:30
जर आरक्षण मिळाले नाही तर विधान भवनावर मोर्चा काढणार
जालना : आम्ही आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ज्याप्रमाणे रस्त्यावर लढतोय, त्याप्रमाणेच न्यायालयातही लढतोय. सरकारही आरक्षण देण्यासाठी सकारात्मक असून, सरकारने एक समिती तयार केली आहे. ही समिती दोन ते तीन दिवसांत इतर राज्यात जाऊन अभ्यास करणार आहे. त्यात नऊ जणांचा समावेश आहे. जर सरकारने आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही विधानभवनावर मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी जालना शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
पुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले की, कोणत्याही हिंसेचे आम्ही समर्थन करीत नाही, आम्ही निषेधच करतो; परंतु, २१ नोव्हेंबर रोजी जी घटना घडली, ती घटना घडविण्यामागे कोण होते. धनगर समाजाच्या प्रतिनिधींशी, समाजबांधवांशी असंवेदनशीलपणे ज्यांनी वागणूक दिली, त्यांची चौकशी करण्याची मागणी मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्य सरकारला आमची विनंती आहे, ज्या पद्धतीने चुकीचे गुन्हे नोंदविले आहे, ते मागे घेण्यात यावे. काही ओबीसी बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला; परंतु, त्यांची नावे जाणूनबुजून टाकण्यात आली आहे. आरक्षणासाठी सरकारला ५० दिवसांचा कालावधी दिला होता; परंतु, सरकारने आरक्षण दिले नाही. राज्यात धनगड समाज नाही. त्याला धनगर समजून सरकारने जीआर काढावा. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन धनगर समाजाला एसटीचे जात प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली होती;
परंतु, सरकारने आम्हाला ते अधिकार नसल्याचे सांगितले. मग आम्ही त्यांना मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि बिहार येथील जीआर दाखविले. त्यानंतर सरकारने याचा अभ्यास करण्यासाठी नऊ जणांची कमिटी नियुक्ती केली आहे. दोन ते तीन दिवसांत ती समिती इतर राज्यांत पाठविली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आम्हाला अभिमान आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आरक्षण दिले. आमचे एकच साहेब आहेत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरसाहेब. काही पुरागामी नेते समजणारे त्यांच्या नेतृत्वात अनेक जातीवादी आता आरक्षण मागतात; परंतु, ते साधे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नावही घ्यायला तयार नाही. त्यांचा सन्मानही करायला तयार नाही, असेही ते म्हणाले.
आयजी आणि जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी
जालना येथील घटनेबाबत मी अपर पोलिस अधीक्षकांशी बोललो होतो. ते म्हणाले की, काही नुकसान झाले नाही. आम्ही किरकोळ केस दाखल करतो. दहा लोकांची नावे द्या. त्यानंतर मी दहा लाेकांची नावे देण्यास सांगितले; परंतु, नंतर आयजी आले, त्यानंतर काय किल्ली फिरली. त्यांनी ३६ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्यामागे कोणी अदृश्य शक्ती आहे का, त्यामुळे त्यांची आणि जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी मी गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
पवारांना तुम्ही प्रश्न विचारला?
जर धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही तर तुम्ही राजीनामा देणार का, असा प्रश्न पत्रकारांनी आमदार पडळकर यांना विचारला. त्यावर उत्तर देताना पडळकर म्हणाले की, पवारांना तुम्ही असा प्रश्न विचारला का की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर तुम्ही राजीनामा देणार का? मी ताकदीने लढतोय, समाज माझ्या पाठीमागे आहे, असे सांगून ते म्हणाले की, जर आरक्षण मिळाले नाही तर विधान भवनावर मोर्चा काढणार आहे, असे त्यांनी सांगितले.