आई-वडील शेतकामात व्यस्त, इकडे झोक्यात झोपलेली दीड वर्षांची चिमुकली गायब
By दिपक ढोले | Published: September 28, 2022 06:00 PM2022-09-28T18:00:20+5:302022-09-28T18:01:26+5:30
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध सुरू केला आहे.
जालना : झोक्यात झोपलेल्या दीड वर्षांची चिमुकली गायब झाल्याची घटना जालना तालुक्यातील निधोना परिसरात बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. श्रावणी जगनाथ डकले असे गायब झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. चंदनझिरा पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.
जगनाथ डकले हे निधोना रोडवरील जिंदल इंग्लिश स्कूलजवळील पवार यांच्या शेतात मजूर म्हणून काम करतात. ते आपल्या पत्नीसह दोन मुलांसोबत तेथेच राहतात. बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात काही महिलांबरोबर काम करीत होती. त्यांनी मुलीला घरासमोर एका झोक्यात टाकले होते. काही वेळाने जगनाथ डकले यांनी मुलीला आईकडे दुध पाझण्यासाठी आणले. नंतर पुन्हा झोक्यात झोपी घातले. डकले हे आपल्या पत्नीकडे निघून गेले.
काहीवेळाने जगनाथ डकले हे पुन्हा झोक्याकडे गेले असता, त्यांना चिमुकली दिसून आली नाही. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली. परंतु, चिमुकली दिसून आली नाही. याची माहिती चंदनझिरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध सुरू केला. घराजवळ असलेल्या विहिरीतही मुलीला पाहण्यात आले. अग्निशमक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. जवानांनी विहिरीत शोध घेतला असता, मुलगी मिळून आली नाही. या घटनेची अद्याप चंदनझिरा पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही.