बाजारातून चोरीला गेली बैलजोडी; २२ दिवसांनी परत मिळताच शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू

By विजय मुंडे  | Published: May 27, 2023 03:38 PM2023-05-27T15:38:48+5:302023-05-27T15:41:25+5:30

मंठा पोलिसांची कामगिरी; शेतकऱ्यांनी बैलांची खरेदी-विक्री करताना दक्षता घ्यावी

A pair of oxen were stolen from the market; Tears of joy in the eyes of the farmer when he got back after 22 days | बाजारातून चोरीला गेली बैलजोडी; २२ दिवसांनी परत मिळताच शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू

बाजारातून चोरीला गेली बैलजोडी; २२ दिवसांनी परत मिळताच शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू

googlenewsNext

मंठा : शहरातील जनावरांच्या बाजारातून चोरीला गेलेल्या दौन बैलांचा शोध घेण्यात मंठा पोलिसांना यश आले आहे. चोरीला गेलेले दोन बैल तब्बल २२ दिवसांनी २६ मे रोजी परत मिळाल्याने तक्रारदार शेतकरीही चांगलाच गहिवरला होता.

तालुक्यातील वझर सरकटे येथील विठ्ठल त्र्यंबक आघाव यांनी आर्थिक अडचणींमुळे ८० हजार रुपये किमतीचे दौन बैल विक्रीस काढले होते. आघाव यांनीते दोन्ही बैल ५ मे रोजी मंठा येथील बाजारात विक्रीसाठी आणले होते. बैल एका ठिकाणी बांधून ते भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. ती संधी साधत चोरट्यांनी त्यांचे बैल चोरून नेले. चोरीस गेलेल्या बैलांचा आघाव यांनी गाव शिवारात शोध घेण्याचा प्रयत्न केला. शोधूनही बैलांचा थांगपत्ता लागत नसल्याने आघाव यांनी २४ मे रोजी मंठा पोलिस ठाणे गाठून बैल चोरीची तक्रार दिली होती. तक्रार दाखल होताच पोनि. संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आघाव यांच्याकडून ५ मे रोजी घडलेल्या घटनांची माहिती घेतली. त्यानुसार आठवडी बाजारात आलेल्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका व्यापाऱ्यानेच आघाव यांचे बैल चोरून ते रिसोड शिवारात विक्री केल्याचे समजले होते. 

या माहितीवरून पोलिसांनी २६ मे रोजी रिसोड शिवार गाठून ज्या शेतकऱ्याने चोरीचे बैल खरेदी केले होते. त्याच्याकडून ते ताब्यात घेतले आणि तक्रारदार विठ्ठल आघाव यांना ते परत दिले. चोरीस गेलेले बैल २२ दिवसांनी परत मिळाल्याने शेतकरी आघाव यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते. ही कामगिरी पोनि. संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. बलभीम राऊत, पोहेकॉ उत्तम राठोड, पेाहेकॉ राजू राठोड, पोना श्याम गायके, पोकाॅ विजय जुंबडे, होमगार्ड बालासाहेब राठोड यांच्या पथकाने केली.

‘त्या’ व्यापाऱ्याचा शोध सुरू
मंठा येथील आठवडी बाजारातून बैल चोरणाऱ्या त्या व्यापाऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत. शिवाय शेतकऱ्यांनी बैलांची खरेदी-विक्री करताना दक्षता घ्यावी, आठवडी बाजारात रीतसर पावत्या करूनच बैलांची खरेदी-विक्री करावी, असे आवाहन मंठा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title: A pair of oxen were stolen from the market; Tears of joy in the eyes of the farmer when he got back after 22 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.