जांबसमर्थ येथील ऐतिहासिक मूर्तींचा शोध लागेना; माहिती देणाऱ्यास २ लाखांचे बक्षीस जाहीर
By दिपक ढोले | Published: October 13, 2022 04:32 PM2022-10-13T16:32:56+5:302022-10-13T16:33:23+5:30
२२ ऑगस्ट रोजी घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यातून राम, लक्ष्मण, सीता, हनुमान या देवांच्या पंचधातूच्या मूर्तीं चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या.
जालना : घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील मंदिरातून पंचधातूच्या चार मूर्ती चोरी जाऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी होत आहे. मात्र, अद्यापही पोलिसांना मूर्तींचा शोध लागला नाही. शेवटी मूर्तींची माहिती देणाऱ्यास जिल्हा पोलीस दलाने २ लाखांचे बक्षीस जाहीर केले असून, मूर्तींसंदर्भात कुठलीही माहिती नागरिकांना असल्यास त्यांनी तत्काळ द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
२२ ऑगस्ट रोजी घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यातून राम, लक्ष्मण, सीता, हनुमान या देवांच्या पंचधातूच्या मूर्तीं चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी पुजारी धनंजय वसंतराव देशपांडे यांच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर पोलिसांनी या घटनेचा तपास केला. अनेक गुन्हेगारांची चौकशी केली. शिवाय, गावासह परिसरातही तपासणी केली. परंतु, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. पोलिसांनी मुंबईसह देशभरात मूर्तींचा शोध घेतला. परंतु, काहीच हाती लागले नाही. या घटनेला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी झाला आहे. मूर्तींचा शोध घेण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांसह राज्यकीय नेत्यांनी आंदोलन केले आहे. दरम्यान, मूर्तींचा शोध लागत नसल्याने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मूर्तींची माहिती देणाऱ्यास जवळपास २ लाख रूपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
यांच्याशी करा संपर्क
नागरिकांना मूर्तींची माहिती मिळाल्यास त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, सपोनि. योगेश धाेंडे, पोउपनि. प्रमोद बोंडले यांच्यासह नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाचशे वर्ष जुन्या आहेत मूर्ती
तीर्थक्षेत्र जांबसमर्थ हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. येथील जांबसमर्थ मंदिर, श्रीराम मंदिरात इ.स. १५३५ मधील श्री राम, सितामाता, लक्ष्मण व हनुमान यांच्या पंचधातूच्या सहा मूर्ती होत्या. विशेषत: श्री समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागत असताना भिक्षापात्रात ठेवली जाणारी व हाताच्या दंडावर बांधली जाणारी हनुमानाची मूर्तीही या मंदिरात होती. चोरट्यांनी २२ ऑगस्ट रोजी पाहटे श्रीराम मंदिरातून श्रीराम, सितामाता, लक्ष्मण, हनुमानांच्या दोन मूर्तींसह सहा पंचधातूंच्या मूर्तींची चोरी केली आहे.