वडिलांना न सांभाळणाऱ्या नोकरदार मुलास चपराक; दरमहा ५ हजार देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 05:25 PM2023-04-28T17:25:27+5:302023-04-28T17:26:19+5:30

वडील म्हणतात मुलांच्या नावे जमीन करुन देण्याची चूक करू नका

A slap to the servant boy who does not care for his aged father; Sub Divisional Officer's order to pay 5 thousand per month | वडिलांना न सांभाळणाऱ्या नोकरदार मुलास चपराक; दरमहा ५ हजार देण्याचे आदेश

वडिलांना न सांभाळणाऱ्या नोकरदार मुलास चपराक; दरमहा ५ हजार देण्याचे आदेश

googlenewsNext

- फकिरा देशमुख
भोकरदन:
आरोग्य खात्यात चांगल्या पगारावर नोकरीवर असतानाही वडिलांचे पालनपोषण न करणाऱ्या मुलास चांगलाच धडा मिळाला आहे. मुलाने दरमहा 5 हजार रुपये वडिलांना द्यावे असा असा महत्वपूर्ण निकाल उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिला. या निकालाने वडिलांची जबाबदारी झटकणाऱ्या मुलास चपराक ठरली आहे.

या बाबतची माहिती अशी की, तालुक्यातील हिसोडा येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी सरपंच कडूबा सयाजी जगताप यांना सुधाकर, भास्कर, राजू व कैलास अशी चार मुले आहेत. त्यापैकी भास्कर, राजू व कैलास ही तीन मुले शेती करतात. तर सुधाकर हा टाकरखेड ( तालुका  देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा ) येथे आरोग्य विभागात शासकीय नोकरी करत आहे. त्यास दरमहा 50 हजार रुपये इतके शासकीय वेतन आहे. 
कडूबा जगताप यांनी चारही मुलांचे उत्तमप्रकारे पालनपोषण करून वाढवले. त्यांचे थाटामाटात विवाह करून दिले. एवढेच नाही तर आपल्या नावावरील सर्व शेतजमीन त्यांच्या नावावर करून दिली. दरम्यान, सुधाकर याच्याकडे राहणाऱ्या कडूबा यांच्या पत्नीचे एक वर्षांपूर्वी निधन झाले. तर कडूबा जगताप हिसोडा येथे शेती करणाऱ्या मुलासोबत राहतात त्यांचे वय 82 वर्ष आहे. तसेच त्यांना पक्षाघात झालेला आहे. उपचारासाठी त्यांना 25 हजार रुपये आवश्यक आहेत. 

त्यामुळे त्यांनी नोकरीत असलेल्या सुधाकर जगताप याच्याकडून 10 हजार रुपये दरमहा व शेती करणाऱ्या तिन्ही मुलाकडून प्रत्येकी 5 हजार प्रमाणे 15 हजार रुपये मिळावे यासाठी आई वडील व जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 चे कलम 5 व 9 अन्वये उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. दरम्यान, उपविभागीय अधिकारी चोरमारे यांनी सुनावणी घेतली असता शेती करणारे तिन्ही मुले वडील कडूबा जगताप यांना शेतीच्या उत्पन्नातून 6 हजार रुपये देतात असे अर्जदाराने मान्य केले. मात्र, नोकरी असलेला मुलगा सुधाकर जगताप याने वडिलांच्या पालन पोषणाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत एक रुपयाही दिला नसल्याचे अर्जदार कडूबा जगताप यांनी उपविभागीय अधिकारी चोरमारे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर २५ एप्रिल रोजी चोरमारे यांनी सुधाकर जगताप याने वडिलांना 5 हजार रुपये खावटी द्यावी असा निर्णय दिला. 

वृद्धावस्थेत आधाराची गरज
जन्मदात्या आई-वडिलांना वृद्धावस्थेत खऱ्या आधाराची गरज असते. अशावेळी मुलांकडून दुर्लक्ष केले जाते. 2022 मध्ये 11 व 2023 मध्ये आतापर्यंत 2 अशी 13 प्रकरणे माझ्याकडे दाखल करण्यात आली होती. ते प्रकरणे निकाली काढत जेष्ठ नागरिकांना न्याय देण्यात आला आहे. मुले सांभाळ करीत नसतील पालकांनी तत्काळ संपर्क करावा.
- अतुल चोरमारे, उपविभागीय अधिकारी 

जमीन नावावर करू नका 
काबाडकष्ट करून मुलांना मोठे केले. जमीन त्यांच्या नावे करून दिली. ती चूक कोणी करू नये. तीन मुले सांभाळ करतात. मात्र ज्याला नोकरी लागेपर्यंत सांभाळले त्याने धोका दिला. आज न्याय मिळाला आहे. 
- कडूबा जगताप

Web Title: A slap to the servant boy who does not care for his aged father; Sub Divisional Officer's order to pay 5 thousand per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.