कौटुंबिक वादातून गोळी झाडून जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न
By दिपक ढोले | Published: August 9, 2022 06:54 PM2022-08-09T18:54:15+5:302022-08-09T18:54:40+5:30
अनिल गाढवे हे २०११ साली औरंगाबादहून जालना येथे बदली होऊन आले होते.
जालना : कौटुंबिक वादातून राज्य राखीव पोलीस दलातील एका ३५ वर्षीय जवानाने गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना जालना शहरातील एसआरपीएफ परिसरात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. अनिल दशरथ गाढवे (३५ रा. जालना) असे जवानाचे नाव आहे.
अनिल गाढवे हे २०११ साली औरंगाबादहून जालना येथे बदली होऊन आले होते. त्यांचा कौटुंबिक वाद सुरू होता. मंगळवारी सकाळपासूनच ते निराश होते, असे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी ते तीन मित्रांसोबत ड्युटीवर होते. साडेतीन वाजेच्या सुमारास तिन्ही मित्र झोपी गेले. त्याचवेळी अनिल गाढवे यांनी रायफल धरून मानेजवळ गोळी झाडली. गोळीचा आवाज येताच, तेथील जवान तात्काळ उटले. त्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली. नंतर गाढवे यांना तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना औरंगाबाद येथे रेफर केले आहे. माहिती मिळताच, सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती पोउपनि. राजेंद्र वाघ यांनी दिली.