जालन्यातील स्टील कंपनीची झाडाझडती; प्राप्तीकर विभागाच्या १०० अधिकाऱ्यांकडून तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 06:41 PM2024-03-09T18:41:39+5:302024-03-09T18:43:03+5:30
औद्योगिक नगरी असलेल्या जालना शहरातील कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर जीएसटी विभाग, प्राप्तिकर विभागाची करडी नजर असते.
जालना : कर चुकविल्याच्या संशयावरून मुंबई, नाशिक येथील प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी गुरुवारी पहाटे जालन्यातील एका स्टील कंपनीसह दोन व्यापाऱ्यांची दुकाने, आस्थापनांवर धाडी टाकल्या आहेत. या पथकांकडून संबंधित कंपनी व आस्थापनांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.
औद्योगिक नगरी असलेल्या जालना शहरातील कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर जीएसटी विभाग, प्राप्तिकर विभागाची करडी नजर असते. दोन महिन्यांपूर्वीच जालन्यातील काही व्यावसायिकांवर जीएसटी विभागाच्या पथकांकडून धाडी टाकण्यात आल्या होत्या. या कारवाईनंतर गुरुवारी ७ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास प्राप्तिकर विभागाच्या शंभरावर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २५ ते ३० वाहनांतून जालना शहरातील एका स्टील कंपनीसह दोन व्यापाऱ्यांच्या आस्थापना आणि घरांवर धाडी टाकल्या आहेत. कंपनीच्या व्यवहारांची, कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. शिवाय संचालकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते.
या कारवाईत काही कागदपत्रे, संगणकातील माहिती ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. मात्र, किती रकमेवरील कर चुकविला, जप्त केलेली कागदपत्रे आदी कारवाईचा तपशील प्राप्तिकर विभागाच्या पथकांकडून देण्यात आला नाही. प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी केलेल्या कारवाईमुळे ‘एमआयडीसी’तील व्यवहारांवर परिणाम झाला होता. अनेक मालवाहतूक वाहने रस्त्याच्या कडेला तासन्तास उभी होती. शिवाय मालाची आयात-निर्यात यावरही मोठा परिणाम झाल्याचे काही व्यापाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.
दोन व्यापारीही चौकशीच्या फेऱ्यात
जालना शहरातील दोन बडे व्यापारीही प्राप्तिकर विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या आस्थापनांसह दुकानांची चौकशी सुरू आहे. कर चुकविल्याच्या कारणावरून ही तपासणी केली जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.