अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीस धडक; युवक ठार, भाचा जखमी
By विजय मुंडे | Published: May 29, 2024 06:50 PM2024-05-29T18:50:06+5:302024-05-29T18:51:29+5:30
साष्टपिंपळगाव शिवारातील घटना : बळेगाव गावावर शोककळा
वडीगोद्री (जि. जालना) : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर मृताचा भाचा जखमी झाला. ही घटना शहागड-पैठण मार्गावरील साष्टपिंपळगावजवळ मंगळवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
सोपान जनार्धन टेकाळे (वय ३०, रा. बळेगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. सोपान टेकाळे व त्याचा भाचा सुरज संतोष राखुंडे (वय १४, रा. सुखापुरी) हे मंगळवारी रात्री दुचाकीवरून शहागड येथून बळेगावकडे जात होते. त्यांच्या दुचाकीस रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास साष्टपिंपळगाव शिवारात आली असता एका अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिली. यात सोपान टेकाळे हा गंभीर जखमी झाला. तर त्यांचा भाचा सुरज हा रस्त्याच्या कडेला असलेल्या काट्यात पडल्याने त्याच्या डोक्यात काटे घुसले असून, तो किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर वाळूचे ट्रॅक्टर पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच बळेगाव व साष्ट पिंपळगाव येथील नागरिकांनी घटनास्थळी येऊन टेकाळे याला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले. या प्रकरणात बुधवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे तरुणाचा मृत्यू झाल्याने नागरिकांतून रोष व्यक्त होत आहे. सोपान टेकाळे याच्या अपघाती मृत्यूमुळे बळेगाव गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी एक दीड वर्षाचा मुलगा, भावजय व पुतणे असा परिवार आहे.
टेकाळे कुटुंबातील दुसऱ्या मुलाचाही अपघाती मृत्यू
बळेगाव येथील टेकाळे यांच्या कुटुंबातील भारतीय सैन्य दलात असलेला ज्ञानेश्वर या मोठ्या मुलाचा २८ जून २०१४ रोजी कुलरचा शॉक लागून अपघाती मृत्यू झाला होता. तर शहागड वरून बळेगावकडे जाताना मंगळवारी २८ मे रोजी रात्री सोपान टेकाळे याचा अपघाती मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन्ही युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याने टेकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.