दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील गावाची परवड, शंभर बालके पोलिओ डोसपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 04:39 PM2024-03-03T16:39:28+5:302024-03-03T16:39:40+5:30

दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या तळेगाव वाडीतील ग्रामस्थ शासन सेवेपासून वंचित राहत आहेत.

A village on the border of two districts, hundreds of children not getting polio doses | दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील गावाची परवड, शंभर बालके पोलिओ डोसपासून वंचित

दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील गावाची परवड, शंभर बालके पोलिओ डोसपासून वंचित

रऊफ शेख/ फुलंब्री : आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी(दि.3) देशभरात पोलिओ डोस देण्यात येत आहे. मात्र, तळेगाव वाडी येथील बालके या डोसपासून वंचित राहिली आहेत. गावात सकाळी पोलिओचे बुत आलेच नाही. दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या या गावाची मागील काही वर्षांपासून सुरू असलेली परवड अजूनही तशीच आहे. 

दोन हजार लोकसंख्या असलेल्या तळेगाव वाडी आणि तळेगाव मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. तळेगावचा पूर्णपणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात समावेश करण्यात आला, पण तळेगाव वाडीला वगळण्यात आले. हा प्रकार राजकीय हस्तक्षेपामुळे घडला, त्यामुळे आमच्या गावाचा  फुलंब्री तालुक्यात समवेश करा, अशी मागणी तळेगाव वाडीच्या ग्रामस्थांची आहे. पण, अजूनही यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. 

तळेगाव वाडी गावाचा शिक्षण विभाग आणि पंचायत समितीचा कारभार फुलंब्री तालुक्यातून चालतो, तर कृषी, भूमी अभिलेख, रजीष्ट्री, आरोग्य आणि पोलीस विभागाचा कारभार भोकरदन तालुक्यात आहे. असे असले तरी आरोग्य विभाग या गावात आपली सेवा देत नाही. त्यांच्याकडून एक पत्र जारी करण्यात आले, त्यात तळेगाव वाडी गावाची सेवा बंद केल्याचा उल्लेख आहे. 

पोलिओ डोससारखी अति महत्वाची सेवा देण्यासाठी गाव आमच्या तालुक्यात नाही, असे भोकरदन आरोग्य विभाग सांगताहेत, तर दुसरीकडे फुलंब्री तालुक्यातील आरोग्य विभागाकडून तळेगाव वाडीचा कारभार आमच्याकडे आलेला नाही, असे सांगितले जात आहे. या दोन जिल्ह्यांच्या कारभारात मात्र तळेगाव वाडीचे ग्रामस्थ शासनाच्या सेवेपासून वंचित राहत आहेत. विशेष म्हणजे, येथे पोलिओ डोस देण्यालायक गावात 110 बालके आहेत, पण त्यांना डोस मिळाला नाही. 

आरोग्य विभागाला बिडीओकडून पत्र मिळाले त्यानुसार आम्ही सेवा बंद केली. महत्वाची सेवा म्हणून यावर विचार करतो, अशी प्रतिक्रिया भोकरदनचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रघुवीर चंदेल यांनी दिली. तर, तळेगाव वाडी येथे आरोग्य सेवा देण्या संदर्भात फुलंब्री आरोग्य विभागाला अजूनतरी कोणतीच सूचना आलेली नाही, ते गाव आमच्या पोर्टलला नाही, रेकॉर्डलाही नाही, त्यामुळे तेथे पोलिओ बुत लावण्यात आला नाही, अशी माहिती फुलंब्रीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्ना भाले यांनी दिली.

Web Title: A village on the border of two districts, hundreds of children not getting polio doses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.