छत्रपती संभाजीनगरात मतदानासाठी येणाऱ्या तरुण डॉक्टरने विमानात वाचविले महिलेचे प्राण

By संतोष हिरेमठ | Published: May 13, 2024 12:46 PM2024-05-13T12:46:23+5:302024-05-13T13:12:53+5:30

दिल्ली- छत्रपती संभाजीनगर विमान प्रवासादरम्यानची घटना, प्रसंगावधान राखून विमानात प्राथमिक उपचार

A young doctor coming to vote in Chhatrapati Sambhajinagar saved a woman's life in an airplane | छत्रपती संभाजीनगरात मतदानासाठी येणाऱ्या तरुण डॉक्टरने विमानात वाचविले महिलेचे प्राण

छत्रपती संभाजीनगरात मतदानासाठी येणाऱ्या तरुण डॉक्टरने विमानात वाचविले महिलेचे प्राण

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिल्लीहून येणाऱ्या तरुण डाॅक्टरने विमानात प्रकृती बिघडलेल्या एका ५१ वर्षीय महिलेचे प्राण वाचविल्याची घटना रविवारी सकाळी एअर इंडियाच्या विमानात घडली.

डाॅ. अभिनव राम औरंगे असे या महिलेचे प्राण वाचविणाऱ्या डाॅक्टरचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आयुष्यातील पहिला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स, दिल्ली) येथील डॉ. अभिनव राम औरंगे हे रविवारी रोजी पहाटे ५ वाजता एअर इंडियाच्या विमानाने छत्रपती संभाजीनगरला येत होते. 

दिल्ली विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर साधारणतः सकाळी ६ वाजता विमानातील एका ५१ वर्षीय महिलेला अचानक उलट्या होऊन छातीत आणि पाठीत तीव्र वेदना सुरू झाल्या. ही बाब विमानातील अन्य प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. यासंदर्भात विमानातील कर्मचाऱ्यांनी तातडीची डॉक्टरांच्या मदतीची उद्घोषणा केली. ती ऐकताच डाॅ. अभिनव राम औरंगे यांनी प्रसंगावधान राखून मदतीसाठी धाव घेतली. विमानात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय औषधींच्या साहाय्याने त्यांनी प्राथमिक उपचार करून या महिलेची प्रकृती स्थिर केली.

खासगी रुग्णालयात दाखल
छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळावर विमान उतरल्यावर या महिलेला एका खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: A young doctor coming to vote in Chhatrapati Sambhajinagar saved a woman's life in an airplane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.