आजुबाईच्या स्वारीचा शनिवारी आन्वा येथे सोहळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:39 AM2019-04-12T00:39:16+5:302019-04-12T00:39:22+5:30

भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून आन्वा येथील जगदंबा आजुबाईची स्वारी शुक्रवारी मध्यरात्री निघणार आहे.

Aajubai raid Saturday at Anwa ... | आजुबाईच्या स्वारीचा शनिवारी आन्वा येथे सोहळा...

आजुबाईच्या स्वारीचा शनिवारी आन्वा येथे सोहळा...

googlenewsNext

हुसेन पठाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आन्वा : भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून आन्वा येथील जगदंबा आजुबाईची स्वारी शुक्रवारी मध्यरात्री निघणार आहे. मागील १५ वर्षापासून प. पू. सोनू महाराज स्वारी घेतात.
या यात्रेला मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक आदी ठिकाणांहून भाविक स्वारीच्या दर्शनासाठी येतात. अष्टमीस सकाळी प. पू. सोनू महाराजांना मंत्र घोषात स्नान घातले जाते. नंतर महाराज देवीच्या ध्यानस्थ होतात. रात्री १२ वाजेच्या दरम्यान गावातील भगवतीची आज्ञा घेतात. गावातील मंदिर हे आजुबाई यांचे देवस्थान आहे. आज्ञा घेतल्यावर अपूर्व संचारात ते श्री आजुबाई देवीचे वस्त्र परिधान करतात. यानंतर देवीला आरसा दाखवून स्वरूप दर्शन घडविले जाते. व स्वारी निघते. दरम्यान गावातील मंदिरात भाविक पोता ऊजळतात. भक्तगण नवसाच्या पोता कबूल करून पोता खेळतात.
दरम्यान पोतांचा प्रकाश पसरतो. वाद्यांचा गजर होतो. जनसमुदाय भक्तिभावात रंगून जातो. धर्म, वंश, वय, जात यांच्या पलीकडे गेलेले आजुबाईचे भक्त आजुबाईचा जयजयकार करतात. याच दरम्यान आजुबाईची स्वारी निघते. जयघोषाच्या निनादात स्वारी गावातील मंदिरात जाते. तेथे शस्त्रधारण विधी होतो. नंतर स्वारी शांत होते. प. पू. सोनू महाराजांचे आजुबाई स्वरूपातील दर्शन करून भक्तगण घराकडे जातात.
स्वारीची
आख्यायिका
शके १४९४ चैत्र शु. चतुर्थीस श्री. क्षेत्र आन्वा येथे तुकारामपंत व चंद्रिकाबाई यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवती तुळजा भवानीने अवतार धारण केला. पाच वर्षाच्या अवतार कार्यात जगदंबा आजुबाईने राजापासून रंकापर्यंत अनेकांचे दु:ख निवारण केले. व दीन, पीडितांचा उद्धार करुन लोकांना भक्तीच्या मार्गास लावले. यामुळे जगदंबेची ख्याती सर्वदूर पसरुन भक्तांची रीघ लागली. भगवतीने तूकारामपंतांना पुत्र- प्राप्तीचे वरदान देऊन अंतर्धान होण्याचे ठरविले. त्यामुळे सर्वजण दु:खात बुडाले व जगदंबेच्या दर्शनास आपण अंतरणार हे सहन न होऊन ते भगवतीची प्रार्थना करू लागले की, माते तुझ्या दर्शनापासून आम्हास दूर नको ठेवू. तू आम्हास सोडून जाऊ नकोस. यावेळी आजुबाईने नागरिकांचे सांत्वन करताना सांगितले की, दरवर्षी चैत्र शुद्ध अष्टमीस माझ्या वंशातील पुरुष माझी स्वारी घेईल व त्यावेळी मी त्यांच्याद्वारे सर्वांना दर्शन देईन. सर्वांच्या मनोकामना त्यातून पूर्ण होतील. असे अभिवचन देऊन भगवती आजुबाई अंतर्धान पावली. त्यानंतर तुकारामपंतांनी चैत्र शुद्ध अष्टमीस वस्त्र परिधान करून स्वारी घेतली व भगवतीने आपल्या वचनाप्रमाणे सर्वांना दर्शन दिले. तेव्हापासून आजपर्यंत श्री आजुबाई देवीची स्वारीची परंपरा वंश परंपरेने सुरू आहे. सध्या प. पू. श्री. सोनू महाराज २००४ पासून स्वारी घेत आहेत. या पूर्वी १९६२ पासून सदगुरू लक्ष्मीकांत महाराज स्वारी घेत असत. सदगुरू लक्ष्मीकांत हे ब्रह्मज्ञानी तपस्वी, आजन्म ब्रह्मचारी व संपूर्ण जीवन आजुबाई चरणी वाहिलेले परमपुरूष होते. त्यांचा शिष्यवर्ग महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही पसरलेला आहे.

Web Title: Aajubai raid Saturday at Anwa ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.