अबब! पाळीव कुत्रा दोन लाख रुपयांना; महिन्याचा खर्चही दहा हजारांच्या घरात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:29 AM2021-08-29T04:29:39+5:302021-08-29T04:29:39+5:30
जालना : पूर्वीपासूनच पाळीव प्राण्यांमधील सर्वात प्रामाणिक प्राणी म्हणून ओळख असलेल्या श्वानाची आता चांगलीच चलती आहे. अनेक श्रीमंत आणि ...
जालना : पूर्वीपासूनच पाळीव प्राण्यांमधील सर्वात प्रामाणिक प्राणी म्हणून ओळख असलेल्या श्वानाची आता चांगलीच चलती आहे. अनेक श्रीमंत आणि हौशी नागरिकांकडे २५ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंतचे श्वान आढळून येतात. अनेक जण या श्वानांवर आपल्या मुलांप्रमाणे किंबहुना त्यापेक्षाही अधिक प्रेम करतात.
श्वान पाळण्याची आपल्याकडे जुनीच पद्धत आहे. शेतकऱ्यांकडे ज्याप्रमाणे गाय, म्हैस, बैल सांभाळला जातो, त्याचप्रमाणे श्वानाचीही तेवढीच गरज शेतकऱ्यांना असते. एकप्रकारे श्वान म्हणजे तुमच्या घराचा सुरक्षा रक्षकच म्हणून कर्तव्य बजावतो. देशी श्वानाप्रमाणेच परदेशी ब्रिडचे वेगवेगळ्या जातीवंत श्वानांची सध्या देशात चांगलीच चलती आहे. अनेकांच्या घर आणि बंगल्यांमध्ये हे परदेशी जातीचे श्वान मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याचे पाहणीवरून दिसून येते.
छंद आणि सुरक्षादेखील...
आमच्या घरातील श्वान हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून जपले आहे. लहान असताना आणलेले लॅब्रेडॉर हे आता साडेतीन वर्षाचे झाले आहे. त्यामुळे त्या श्वानामध्ये माझ्यासह आमच्या परिवारातील अन्य सदस्यांचाही जीव गुंतला असून, आम्ही मुलीप्रमाणे श्वानांवर प्रेम करत आहोत. यामुळे सुरक्षेसह छंद जोपासला जातो.
- अशुतोष देशमुख, जालना.
आज जगभरातच प्राणी मित्रांची चांगली चलती आहे. मानवी दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिले जाते. चांगल्या दर्जाचे श्वान खरेदी करण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. त्यासाठी ते पैसेही मोजतात. हा पैसा केवळ ते हौस म्हणून नव्हे तर एक प्राणीमात्रांविषयी त्यांच्या प्रेमातूनही तो खर्च केला जातो. काळजी आणि स्वच्छता ठेवल्यास श्वानाचे आरोग्य चांगले राहते.
- मृगनयिनी मोहरीर, डॉग ट्रेनर
श्वानाचे खानपान महत्त्वाचे
श्वानाच्या किमती या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. ज्यांच्याकडे मुबलक पैसे आणि घेतलेल्या दर्जेदार श्वानाचे पालन पोषण करण्याची ऐपत आहे, ते याकडे वळतात; परंतु सध्या श्वान पाळणे म्हणजे एक आवड बनली आहे. त्यातूनच हा खर्च हाेतो. या प्राण्याचे खानपान महत्त्वाचे ठरते.
- मकरंद नाईक, जालना.
लॅब्रेडॉर : ₹ २५०००
लॅब्रेडॉर या श्वानाच्या जातीला मोठी मागणी आहे. २५ हजारापासून ते १ ते सव्वा लाखापर्यंत याची किंमत आहे. सरासरी ५ हजार खाद्यावर खर्च येतो.
गोल्डन रिट्रीव्हर : ₹ १८०००
गोल्डन रिट्रीव्हर या श्वानाच्या जातीला मोठी मागणी आहे. १८ हजारापासून ते एक लाखापर्यंत याची किंमत आहे. सरासरी ७ हजार खाद्यावर खर्च येतो.
राॅटविलर : ₹ ३५०००
रॉटविलर या श्वानाच्या जातीला मोठी मागणी आहे. ३५ हजारापासून ते सव्वा लाखापर्यंत याची किंमत आहे. सरासरी ४ हजार खाद्यावर खर्च येतो.
जर्मन शेफर्ड : ₹ ४००००
जर्मन शेफर्ड या श्वानाच्या जातीला मोठी मागणी आहे. ४० हजारापासून ते १ लाखापर्यंत याची किंमत आहे. सरासरी ८ हजार खाद्यावर खर्च येतो.
पग : ₹ १००००
पग या श्वानाच्या जातीला मोठी मागणी आहे. १० हजारापासून ते ३० हजारापर्यंत याची किंमत आहे. सरासरी ५ हजार खाद्यावर खर्च येतो.