अब्बा... बाबाने भी दम तोड दिया : रूग्णालयात नातेवाईकांचा टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:28 AM2021-05-01T04:28:42+5:302021-05-01T04:28:42+5:30
जालना : अब्बा बाबाने भी दम तोड दिया... असा टाहो मयत कामगाराच्या भावाने वडील दिसताच फोडला. त्यापाठोपाठ त्या मयत ...
जालना : अब्बा बाबाने भी दम तोड दिया... असा टाहो मयत कामगाराच्या भावाने वडील दिसताच फोडला. त्यापाठोपाठ त्या मयत कामगाराची आई, पत्नी आणि अन्य नातेवाईकांचा शोक अनावर झाला होता. येथील दीपक हॉस्पिटलच्या परिसरात सर्वत्र हुंदके आणि एकमेकांना धीर देताना नातेवाईक आणि रूग्णालयाचा परिसर भावूक झाला होता. रेल्वे स्थानक परिसरातील रहिम नगरमध्ये वास्तव्याला असलेला बाबा सैय्यद बेग हा लुकस गायकवाड आणि प्रकाश घोडके उर्फ बाँंड यांच्यासमवेत सेप्टीटँकची सफाई करण्यासाठी गेला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास या तिन्ही कामगारांनी एकमेकांना वाचविण्यासाठी टँकमध्ये उड्या घेतल्या. परंतु, टँकमधील पाणी तसेच कमी मिळालेल्या ऑक्सिजनमुळे या तिघांचाही मृत्यू झाला असावा, असा अंदाज प्रथमदर्शनी बांधला जात आहे.
ही दुर्घटना घडल्यावर रहिम नगरमध्ये राहणारे बाबा सैय्यद बेग याचे वडील सैय्यद बेग हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी लगेचच मुलाला खासगी रूग्णालयात हलवले. यावेळी घटनास्थळी भेट दिली जसता, सर्वत्र सुन्न करणारे वातावरण होते. बाबा सैय्यद याला टँकबाहेर काढून रूग्णालयात हलवले होते. परंतु, अन्य दोन कामगार अर्थात लुकस गायकवाड आणि प्रकाश घोडके यांचे मृतदेह पाण्यात बुडाल्याने दिसत नव्हते. शेवटी अग्निशमन दलातील अधिकारी एस. एम. सोनवणे तसेच कर्मचारी संदीप दराडे, नागेश घुगे, दिनेश ढाकणे, रवी बनसोडे, किशोर सगट, अशोक वाघमारे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. परिसरातील नागरिकांनी देखील पोलीस तसेच पालिका कर्मचाऱ्यांना मदत केली.
नातेवाईक गहिवरले...
सोनल नगरमध्ये सेप्टी टँकची सफाई करताना लुकस गायकवाड आणि प्रकाश घोडके यांचा मृत्यू झाल्याची बातमी रमाई नगरमध्ये धडकताच सर्वत्र शोकमय वातावरण झाले. यावेळी मिळेल त्या गाड्यांवरून मयतांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचत होते. त्यावेळी मयताचे आई-वडील तसेच पत्नीदेखील तेथे उपस्थित होती. अग्निशमन दल आणि पोलिसांनी आता रडणे थांबवून तुमच्या नातेवाईकांना पाहून घ्या, असे समजावत अश्रू पुसण्याचे काम केले. या घटनेने सोनल नगर परिसरही हेलावून गेला होता.