लग्न महिन्यावर असताना होणाऱ्या पत्नीवर अत्याचार, केला खून; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 06:04 PM2023-02-22T18:04:51+5:302023-02-22T18:05:37+5:30
तीन महिन्यांपूर्वी झाला होता साखरपुडा; तरुणास पोलिसांनी मुंबईतून घेतले ताब्यात
जालना : लग्न अवघे एका महिन्यावर आलेले असतानाच एका तरुणाने होणाऱ्या पत्नीचा अत्याचार करून गळा चिरून खून केल्याची घटना मंठा तालुक्यातील बेलोरा गावात शनिवारी दुपारी घडली होती. दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (१७) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणातील संशयित सुशील सुभाष पवार (रा. वरुड, ता. मेहकर) हा फरार झाला होता. मोबाईलच्या लोकेशनद्वारे शोध घेऊन त्याला वसई उपनगर भागातील माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले आहे.
बेलोरा गावातील दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (वय १७) हिचा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरुड येथील सुशील पवार या तरुणासोबत विवाह जुळला होता. येत्या १७ मार्च रोजी विवाह असल्याने शनिवारी वधू आणि वर या पक्षांकडील मंडळी दुसरबीड येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेले होते. हीच संधी साधून सुशील पवार याने थेट बेलोरा हे गाव गाठले. कुटुंबीय बस्त्यासाठी गेल्याने घरी भावी नवरी दीप्ती ही एकटीच होती. तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केला असता, त्याने धारदार शस्त्राने गळा चिरला. त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. घटनास्थळी गावातील लोक जमा होताच सुशील फरार झाला होता. या प्रकरणी मयत मुलीचे वडील संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित सुशील पवार (रा. वरूड, ता. मेहकर) याच्याविरुद्ध अत्याचार, खुनासह पोक्सोअंतर्गत सेवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सेवली पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन पाहिले असता, तो मुंबई येथील माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती सेवली पोलिसांना मिळाली.
या माहितीवरून सेवली पोलिसांनी याची माहिती माणिकपूर पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सेवली पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला जालना येथे आणले जात आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे यांच्यासह सपोनि. नित्यानंद उबाळे, पोलिस कर्मचारी धनंजय लोढे, संतोष चव्हाण, भागवत कदम, शिपाई काळे यांनी केली आहे.
वाट पाहिली नवरदेवाची...वार्ता आली नवरीच्या खुनाची
१८ फेब्रुवारी रोजी बस्ता बांधण्यासाठी वर व वधूकडील मंडळी दुसरबीड येथे गेले. सपनाचे आई-वडील, काका यांच्यासह १२ ते १३ जण दुसरबीड येथे गेले होते. दीड वाजेच्या सुमारास सुशीलचे आई-वडील, मामा, मावसा, काका तेथे आले. त्याचवेळी सपनाच्या वडिलांनी सुशीलबाबत विचारणा केली, तेव्हा नातेवाइकांनी तो दुचाकीवर येत आहे, असे सांगितले. सर्वांनी सुशीलची वाट पाहिली. काही वेळानंतर सुशीलचा भाऊ अमोल याने त्याला फोन केला; परंतु त्याचा फोन बंद होता. बस्ता बांधण्यासाठी वर व वधूकडील मंडळी नवरदेवाची वाट पाहत होते; परंतु तेवढ्यात फोन आला अन् नवरीच्या खुनाची बातमी नातेवाइकांच्या कानावर पडली. त्यानंतर सर्वच नातेवाईक थेट बेलोरा येथे आले. घरात पाहिले असता, सपना हिचा गळा चिरलेला दिसला. तिचे कपडेही अस्ताव्यस्त पडलेले होते.
तीन महिन्यांपूर्वी झाला होता साखरपुडा
बेलोरा येथील संदीप जाधव हे शेती करतात. त्यांना एक मुलगी, दोन मुले आहेत. सपनाचे सातवीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर ती घरीच होती. सपना हिचा तीन महिन्यांअगोदर मेहकर तालुक्यातील वरूड येथील सुशील पवार याच्याशी विवाह जुळला होता. २० डिसेंबर २०२२ रोजी बेलोरा येथे त्यांचा सारखपुड्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दोघेही खुश होते. याच कार्यक्रमात मुलाला दीड लाख रुपये देण्यात आले. नंतर दोघेही जण एकमेकांना फोनवर बोलत होते. सुशील हा दोन ते तीन वेळा सपनाला भेटण्यासाठी आला होता.