लाच प्रकरणात दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर एसीबीची कारवाई
By विजय मुंडे | Published: July 17, 2023 05:30 PM2023-07-17T17:30:36+5:302023-07-17T17:31:05+5:30
भोकरदन पंचायत समितीत एसीबीचे कारवाई; एकाने स्वीकारले सात हजार, दुसऱ्याने केली तीन हजाराची मागणी
भोकरदन : सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे बिल काढण्यासाठी लाच घेणाऱ्या व लाचेची मागणी करणाऱ्या भोकरदन पंचायत समितीतील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने कारवाई केली. एका कर्मचाऱ्याने सात हजार रूपयांची लाच घेतली तर दुसऱ्याने तीन हजार रूपयांची लाच मागितल्याचे कारवाईत समोर आले. ही कारवाई सोमवारी भोकरदन पंचायत समिती कार्यालयात करण्यात आली.
तांत्रिक सहाय्यक (पीटीओ) प्रशांत रामेश्वर दहातोंडे व संगणक परिचालक सतिश रामचंद्र बुरंगे असे कारवाई झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. तालुक्यातील दावतपूर येथील महाराष्ट्र रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत सार्वजनिक पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर मंजूर करण्यात आली होती. विहिरीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचे बिल मस्टर काढण्यासाठी पिटीओ प्रशांत दहातोंडे व मनरेगा कर्मचारी सतिष बुरंगे यांनी पैशाची मागणी केली. तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे, कर्मचारी शिवाजी जमधडे, कृष्णा देठे यांनी सोमवारी भोकरदन पंचायत समिती परिसरात सापळा लावला. त्यावेळी पिटीओ प्रशांत दहातोंडे व कंत्राटी मनरेगा कर्मचारी सतिष बुरंगे यांनी मनरेगा अंतर्गत सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीचे १ लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी ९ हजारांची मागणी केली. तडजोडी अंती ७ हजार रूपये स्वीकारले. तर मनरेगा कर्मचारी सतिष बुरंगे यांनी अंतिम बिलावर सही घेण्यासाठी तीन हजार रूपयांची मागणी केली. परंतु, ते स्वीकारले नाहीत. एकाने पैसे स्वीकारताच पथकाने कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणात भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.