‘एसीबी’कडून चौकशीचा ससेमिरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:10 PM2017-11-20T23:10:33+5:302017-11-20T23:11:13+5:30
घनसावंगी तालुक्यात मग्रारोहयोअंतर्गत सहा वर्षांपूर्वी बोगस विहिरी झाल्याची तक्रारीनंतर आता या विहिरींसह लाभार्थ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी येथील पाच लाभार्थ्यांच्या शेतात जाऊन विहिरींची पाहणी केली.
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यात मग्रारोहयोअंतर्गत सहा वर्षांपूर्वी बोगस विहिरी झाल्याची तक्रारीनंतर आता या विहिरींसह लाभार्थ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी येथील पाच लाभार्थ्यांच्या शेतात जाऊन विहिरींची पाहणी केली.
अँटी करप्शन विभागाने पुन्हा सोमवारी कुंभार पिंपळगाव येथील पाच लाभार्थीच्या विहिरींची शेतात जाऊन तपासणी केली. यापूर्वी गुरुवारी सुध्दा काही विहिरींची तपासणी करण्यात आली होती यावेळी तर ग्रामपंचायत कार्यालयातील नोंद वहीसह कागदपत्रे तपासण्यात आली आतापर्यंत कुंभार पिंपळगावातील दहापेक्षा अधिक विहिरींची तपासणी करण्यात आली तर आणखी अकरा ते बारा विहिरींची तपासणी करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
यावेळी उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पो. ना. संजय उदगीरकर, पो ना रामचंद्र कुदर, ग्राम विकास अधिकारी श्रीरंग थोटे, भूमी अभिलेख छाननी लिपिक उकळकर, दुरुस्ती लिपिक चाळक, मंडळ अधिकारी अप्पासाहेब कोटूळे, तलाठी व्ही. जोगदंड, याचा समावेश असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. २०११ मध्ये तत्कालीन गट विकास अधिका-यांच्या काळात तालुक्यात असंख्य विहिरी या बोगस झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. याबाबत गुरुवारी सुद्धा तपासणी करण्यात आली होती.
कुंभार पिंपळगावातील बावीस विहिरी बोगस असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. हळूहळू सर्व विहिरींची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.