पोलिस ठाण्यात एसीबीचा सापळा, पाच हजारांची लाच घेताना हवालदार ताब्यात
By दिपक ढोले | Published: October 18, 2023 06:51 PM2023-10-18T18:51:07+5:302023-10-18T18:51:49+5:30
गुन्ह्याचा लवकर तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी घेतली लाच
जालना : तक्रारदारावर दाखल असलेल्या गुन्ह्याचा लवकर तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारतांना पोलिस हवालदारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी पोलिस ठाण्यातच सापळा लावून ताब्यात घेतले. उदलसिंग मानसिंग जारवाल (५३ रा. यशवंतनगर अंबड रोड जालना) असे लाच घेणाऱ्या हवालदाराचे नाव आहे.
तक्रारदारावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार उदलसिंग जारवाल यांच्याकडे आहे. तुमच्या गुन्ह्याचा तपास लवकर पूर्ण करून दोषारोपत्र न्यायालयात दाखल करतो, त्यासाठी तुम्हाला पाच हजार रूपयांची लाच द्यावी लागेल, असे जारवाल म्हणाले. तक्रारदाराने याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठ ते दहा कर्मचाऱ्यांनी पाेलिस ठाण्यात सापळा लावला. त्यावेळी तक्रारदाराला नोटाला पावडर लावून पाठविण्यात आले. जारवाल यांनी पंचासमक्ष पाच हजार रूपयांची लाच स्वीकारली.नंतर तक्रारदाराने इशारा केला.
एसीबीच्या पथकाने त्यांना जाग्यावर पकडले. त्याचवेळी तालुका पोलिस ठाण्यात काही वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे, गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे, गजानन खरात, संदीपान लहाने, जावेद शेख, विठ्ठल कापसे, शिवाजी जमधडे, कृष्णा देठे, शिवलिंग खुळे यांनी केली आहे.