४७ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात : सुदैवाने जीवितहानी नाही
By दिपक ढोले | Published: July 2, 2023 07:25 PM2023-07-02T19:25:29+5:302023-07-02T19:25:55+5:30
या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूळ यांनी दिली.
जालना : अचानक ब्रेक लाइनर जाम झाल्याने ४७ प्रवासी घेऊन जाणारी बस रस्त्याच्या खाली गेल्याची घटना जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूळ यांनी दिली.
कळमनुरी ते पुणे ही बस (एमएच.२०.बीए.२६९८) कळमनुरीहून जालन्याकडे दुपारी दोन वाजेच्या सुमारास येत होती. जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात असलेल्या वन विभागाच्या परिसरात अचानक ब्रेक लाइनर जाम झाले. त्यामुळे बस रस्त्याच्या खाली गेली. चालकाने प्रसंगावधान राखत बसला जागेवरच थांबविले. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती बसचालकाने दिली आहे.
दरम्यान, शनिवारी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे खासगी बसला अपघात होऊन २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतरच जालना येथे बसला अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे.