आजारी चिमुकल्याच्या ओढीने घराकडे परतणाऱ्या ऊसतोड मजुराचा अपघाती मृत्यू
By विजय मुंडे | Published: January 31, 2023 12:01 PM2023-01-31T12:01:49+5:302023-01-31T12:02:04+5:30
पीकअप टेम्पोची दुचाकीला धडक; पत्नीसह पुतण्या गंभीर जखमी
आष्टी (जि.जालना) : आजारी असलेल्या सहा महिन्याच्या चिमुकल्यासह दोन मुलींच्या ओढीने घराकडे जाणाऱ्या ऊसतोड मजुराचा पीकअप-दुचाकीच्या अपघातातमृत्यू झाला. तर मयताच्या पत्नीसह पुतण्या गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी रात्री आष्टी- कुंभार पिंपळगाव मार्गावरील ढोकमाळ तांडा पाटीजवळ घडली.
ज्ञानेश्वर बळीराम राठोड (३०) असे मयताचे नाव आहे. तर सिंधू राठोड, बाळू बबन राठोड (तिघे रा. हास्तूर तांडा ता.परतूर) अशी जखमींची नावे आहेत. हास्तूर तांडा येथील ज्ञानेश्वर बळीराम राठोड हे ऊसतोड करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ज्ञानेश्वर राठोड, त्यांच्या पत्नी सिंधू राठोड, पुतण्या बाळू राठोड हे सोमवारी सकाळी ऊसतोडणीच्या कामासाठी कोकाटे हादगाव येथे गेले होते. दिवसभर काम केल्यानंतर रात्री दुचाकीवरून गावाकडे परतत होते. त्यांची दुचाकी (क्र.एम.एच.१३- ए.टी. १३१९) आष्टी- कुंभार पिंपळगाव मार्गावर आली असता भरधाव बोलेरो पीकअपने (एम.एच.२१- एक्स.६५६४) जोराची धडक दिली.
अपघातानंतर तिघे जखमी रस्त्यावर विव्हळत पडले होते. परंतु, वेळेत उपचार न मिळाल्याने ज्ञानेश्वर यांचा मृत्यू झाल्याचे मधुकर राठोड यांनी सांगितले. तर सिंधू राठोड व बाळू राठोड या दोघांना परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. अपघातानंतर पीकअप चालक पळून गेला. या प्रकरणात मंगळवारी सकाळी आष्टी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळाला पोहेका पालवे, राहुल वाघमारे यांनी भेट देवून पंचनामा केला. तपास पोउपनि लव्हारे हे करीत आहेत.
दोन मुलींसह मुलावरील वडिलांचे छत्र हरवले
ज्ञानेश्वर राठोड हे भूमिहिन असून, उदरनिर्वाहासाठी ते ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. त्यांना दोन मुली आणि एक सहा महिन्यांचा मुलगा आहे. लहान मुलाची तब्येत बरी नसल्याने तीन दिवसांपासून त्याला घरीच ठेवून पती-पत्नी ऊसतोडणीसाठी जात होते. परंतु, ज्ञानेश्वर राठोड यांचा अपघाती मृत्यू झाल्याने सहा महिन्यांच्या मुलासह दोन मुलींच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरवे आहे. या घटनेने हास्तूर तांडा व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची मालिका सुरू
पाथरी-आष्टी- कुंंभारपिंपळगाव- अंबड या मार्गाचे काम नुकताच झाले आहे. तर जालना ते परभणी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून नांदेडहून औरंगाबादला जाणारी वाहने पाथरी ते अंबड मार्गावर येत आहेत. या मार्गावर गतीरोधक नाहीत. परिणामी भरधाव वाहनांमुळे अपघाताची मालिका सुरू झाली आहे.