बरेचसे साम्य असल्याने चुकून नेली दुसऱ्याची दुचाकी, परत करण्यास गेला पण गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 08:01 PM2023-08-29T20:01:51+5:302023-08-29T20:02:04+5:30

मारहाण सुरू असतांनाच दाजीला फोन करून दिली माहिती; चोरीच्या संशयावरून तरुणाचा खून, खदानीत टाकला मृतदेह

Accidentally took someone else's bike, killed a youth on suspicion of theft while returning it | बरेचसे साम्य असल्याने चुकून नेली दुसऱ्याची दुचाकी, परत करण्यास गेला पण गमावला जीव

बरेचसे साम्य असल्याने चुकून नेली दुसऱ्याची दुचाकी, परत करण्यास गेला पण गमावला जीव

googlenewsNext

जालना : दुचाकी चोरल्याच्या संशयावरून काठीने मारहाण करून सिध्दार्थ रामदास मांदळे (३० रा. भिलपुरी, ता. बदनापूर) या तरूणाचा खून केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील जवसगाव शिवारात शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी चार जणांविरुध्द बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरेगाव शिवारात ड्रायपोर्टनजीक असलेल्या ढाब्यावर शनिवारी सांयकाळी भिलपुरी येथील सिद्धार्थ मांदळे हा जेवण करण्यासाठी गेला होता. जेवण आटोपून तो परत निघत असतांना चुकीने त्याच्या दुचाकीसारखीच असलेली दुसरी दुचाकी तो घेऊन गेला होता. दुसऱ्याची दुचाकी चुकून आपण घेऊन आल्याची बाब लक्षात येताच, ती परत करण्यासाठी तो मागे निघाला. तेवढ्यात संशयित गणेश कैलास जाधव, आकाश अशोक जाधव, तुळशीराम गायकवाड, कुंडलिक भगवान तिरूखे (रा. दरेगाव, ता. जि.जालना) यांनी पाठलाग करून सिध्दार्थला काठीने मारहाण केली. जवसगाव येथे असलेल्या खदानीजवळ सिद्धार्थ यास गाठून या जमावाने बेदम मारहाण केली. दुचाकी चुकून बदली झाल्याचे सांगत असतांना कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पुरावा नष्ट करण्यासाठी संशयितांनी सिध्दार्थचा मृतदेह जवळच असलेल्या एका खदाणीत फेकून दिला, अशी माहिती पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, बदनापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, पोलिस उपनिरीक्षक खार्डे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी नातेवाइकांच्या मदतीने मृतदेह खदानीतून बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठवला. या प्रकरणी मृताची पत्नी किरण सिध्दार्थ मांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित गणेश कैलास जाधव, आकाश अशोक जाधव, तुळशीराम गायकवाड, कुंडलिक भगवान तिरुखे (सर्व रा. दरेगाव,ता.जालना) यांच्याविरुध्द खून, ॲट्रासिटी ॲक्ट व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे हे करीत आहेत, अशी माहिती पोनि. भागवत यांनी दिली.

मारहाण सुरू असतांनाच दाजीला फोन करून दिली माहिती
सदरील तरूणाने लोक मारत असतांना, दाजीला फोन लावला. याबाबतचा ऑडिओ व्हायरला झाला आहे. त्यात दाजी मला वाचवा, हे लोक मला काठीने मारहाण करीत आहे. तुम्ही लवकर इकडे या, असे त्याने सांगितले. परंतु, काही वेळानंतर त्याचा आवाज बंद झाला.

Web Title: Accidentally took someone else's bike, killed a youth on suspicion of theft while returning it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.