चाकूने भोसकून खून प्रकरणातील आरोपीस दहा वर्षाची शिक्षा
By विजय मुंडे | Published: June 21, 2023 07:46 PM2023-06-21T19:46:36+5:302023-06-21T19:47:00+5:30
या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने नऊ जणांची साक्ष नोंदविण्यात आली.
जालना : खून प्रकरणातील एका आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी दहा वर्षाची शिक्षा सुनावली. तसेच दहा हजार रूपये दंडही ठोठावला आहे. योगेश पुंजाजी फुके (वय-३०. रा. फत्तेपूर ता.भोकरदन) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर येथील योगेश फुके याचा ५ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री अनेकवेळा फोन आल्याने कैलास फुके व सागर भारत बदर (दोघे रा. वालसा वडाळा) हे दोघे फत्तेपूर रोडवरील एमएसईबी सबस्टेशनजवळ गेले होते. तेथील पुलाच्या कठड्यावर सूर्यभान फुके, योगेश फुके हे दोघे बसले होते. त्यावेळी कैलास फुके व योगेश फुके या दोघात वाद झाला. सागर बदर हा भांडण सोडविण्यासाठी गेला. त्यावेळी योगेश फुके याने आमच्या दोघांचे भांडण आहे तू मध्ये कशाला पडतोस म्हणून सागर बदर याच्या पोटात चाकूने वार केले आणि जीपमधून पळून गेला. त्यावेळी कैलास फुके, सूर्यभान फुके यांनी जखमी सागर बदर याला भोकरदन येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. प्रथमोपचारानंतर त्याला जालना येथील रूग्णालयात रेफर करण्यात आले होते.
परंतु, तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती सागर बदर याला मयत घोषित केले. या प्रकरणात भारत बदर यांच्या तक्रारीवरून भोकरदन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोकरदन पोलिसांनी तपासणीअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. भारत खांडेकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एम. मोहिते यांनी आरोपी योगेश पुंजाजी फुके याला दहा वर्षे शिक्षा व दहा हजार रूपयांचा दंड ठोठावल्याची माहिती ॲड. भारत खंडारे यांनी दिली.
नऊ जणांची साक्ष ठरली महत्त्वाची
या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने नऊ जणांची साक्ष नोंदविण्यात आली. यात फिर्यादी, प्रत्यक्ष साक्षीदार, शवविच्छेदन करणारे डॉक्टर, उपचार करणारे कर्मचारी, पंच, तपासीक अंमलदार सपोनि. आर.के.तडवी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.