चोरी करताना पहिल्याने केला खून; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
By दिपक ढोले | Published: March 1, 2023 06:13 PM2023-03-01T18:13:13+5:302023-03-01T18:13:48+5:30
२३ फेब्रुवारी २०२१ रोजी तीर्थपुरी येथील समर्थ बेकरीमध्ये झाली होती खुनाची घटना
जालना : तीर्थपुरी येथील ज्ञानेश्वर शेंडगे यांच्या खून प्रकरणातील आरोपीला अंबड सत्र न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. विरेश्वर यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सचिन पांडुसिंग परदेशी (रा. सोनाई, ता. नेवासा, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.
२३ फेब्रुवारी २०२१ रोजी तीर्थपुरी येथील समर्थ बेकरीमध्ये मयत ज्ञानेश्वर बंडू शेंडगे व आरोपी सचिन परदेशी हे दोघे झोपले होते. आरोपी सचिन याला बेकरीमधील पैसे चोरताना ज्ञानेश्वर शेंडगे यांनी पाहिले होते. शेंडगे हे जास्त काम सांगत असल्याच्या कारणावरून सचिन परदेशी याने शेंडगे यांचा गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून खून केला. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी न्यायालयीन कोठडीत होता. सदरील गुन्ह्याचा सखोल तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी बंडू लक्ष्मण शेंडगे, (रा. घुगर्डे हादगाव), पंच, साक्षीदार राम हरी सुरवसे, तपासिक अधिकारी जी. कै. कोळासे आदींच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सदरील प्रकरणात आरोपी सचिन परदेशी यास कलम ३०२ अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व पाचशे रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील वाल्मीक घुगे यांनी काम पाहिले. तसेच कोर्ट पैरवी बळीराम खैरे, शंकर परदेशी यांनी काम पाहिले.