जालन्यात सराफा दुकानातील चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 05:44 PM2018-12-19T17:44:24+5:302018-12-19T17:44:46+5:30
काही महिन्यापूर्वी येथील एका सराफा दुकानातून भरदिवसा चोरी झाली होती
जालना : काही महिन्यापूर्वी येथील एका सराफा दुकानातून भरदिवसा चोरी करुन लाखो रुपये लंपास करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. इब्राहिम पाशा कुरेशी (२४.रा. कुरेशी मोहल्ला ता. सेलु जि.परभणी) असे आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यातर्फे माहिती मिळाली की, जालना शहरातील सराफा दुकानात चोरी करणारा आरोपी सेलु येथे आहे. या माहितीवरून त्यांनी पथकाला सेलु येथे पाठवून इब्राहीम ऊर्फ इम्मु पाशा कुरेशी याला ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून ५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर यांच्या पथकाने केली आहे.
पाच महिन्यापूर्वी झाली होती चोरी
शहरातील अजय लक्ष्मण कपाळे (३०) यांचे शहरातील रुणवाल कॉम्पेक्समध्ये राजुश्वरी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. २७ जुलै रोजी सांयकाळी पाच वाजता ते लघवीला गेले असता, त्यांनी कॅश काऊंटरमध्ये ठेवले २ लाख ५० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.