तुरुंगातून आरोपीचे पलायन, शोधासाठी पोलिसांची साधू-महाराजांकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 09:07 PM2022-11-12T21:07:46+5:302022-11-12T21:09:42+5:30
हातावर तुरी : जेवणाची पत्रावळी टाकण्याचा बहाना
श्याम पुंगळे
राजूर (जि.जालना) : जेवणाची पत्रावळी टाकण्याचा बहाना करून बलात्कार प्रकरणात कोठडीत असलेल्या संशयित आरोपीने ठाण्यातून पलायन केले. पत्रावळी टाकण्याच्या बहान्याने आरोपीने हातावर तुरी दिल्याने भांबावलेल्या पोलिसांनी चक्क साधू- महाराजांचा आधार घेत त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी रात्री हसनाबाद (ता.भोकरदन) पोलीस ठाण्यात घडली.
राजू शेषराव माळी (रा. पिंप्रीराजा ता. फुलंब्री) असे ठाण्यातून पळालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. राजू माळी हा राजूर येथे घरबांधकाम मजुरीच्या कामासाठी येत होता. यादरम्यान त्याची थिगळखेडा येथील एका कुटुंबियांची ओळख झाली. काही दिवसांपूर्वी थिगळखेडा येथील एका १४ वर्षीय मुलीला घेवून त्याने पलायन केले होते. या प्रकरणात मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार राजू माळी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याला गुरूवारी अटक केली. त्यानंतर त्याला शुक्रवारी जालना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यत पोलीस कोठडी सुनावली होती.
संशयित आरोपी राजू माळी याने शुक्रवारी रात्री ठाण्यात जेवण केले. जेवणानंतर पोलिसांच्या जेवणाच्या पत्रावळी बाहेर फेकून येतो, असे सांगून तो बाहेर गेला आणि ठाण्यातून पळ काढला. तेथील पाेलिसांनी आरोपी पळाल्याचे ओरड करताच ठाण्यात एकच धावपळ सुरू झाली. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी इंदल बहुरे, सपोनि संतोष घोडके यांनी टेंभुर्णी, पारध, भोकरदन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने शुक्रवारी रात्री व शनिवारी दिवसभर शोध मोहीम राबविली परंतु, शनिवारी रात्रीपर्यंत आरोपी पकडण्यात यश आले नव्हते.
महाराजांनी नेले रामनगरला
आरोपी ठाण्यातून पळून गेल्यानंतर पोलिसांकडे कोणताही क्ल्यू नव्हता. आरोपी पकडणे आवश्यक होते. परंतु, पोलिसांना कोणताही मार्ग सापडत नव्हता. आरोपीकडे मोबाईलही नव्हता. मग शोध घ्यायचा कसा? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला. बिचाऱ्या सुशिक्षित पोलिसांनी अक्षरश: साधू- महारांजाचा आधार घेतला. त्यामध्ये राजूर येथील एका महाराजाने पोलीस कर्मचाऱ्यांना रामनगरला नेले. परंतु, त्या महाराजांच्या प्रयत्नांनाही यश न आल्याची चर्चा राजूरसह परिसरात चांगलीच रंगली होती.
ठाण्यातून आरोपी पळून गेलेल्या संशयित आरोपीच्या शोधार्थ शुक्रवारी रात्री व शनिवारी आम्ही परिसर पिंजून काढला. अद्याप त्याचा शोध लागेला नसून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचा शोध घेत आहोत.
-संतोष घोडके, सपोनि हसनाबाद