आचार्य भानुकवी संमेलनात भरगच्च कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:31 AM2017-12-31T00:31:19+5:302017-12-31T00:31:22+5:30
अभिजात मराठी भाषा परिषद, आचार्य भानुकविश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारा आयोजित पहिले राज्यस्तरीय ‘आचार्य भानुकवी मराठी साहित्य संमेलन अंबड येथे होते आहे.
अंबड : अभिजात मराठी भाषा परिषद, आचार्य भानुकविश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारा आयोजित पहिले राज्यस्तरीय ‘आचार्य भानुकवी मराठी साहित्य संमेलन अंबड येथे होते आहे. आद्य कवयित्री महदंबा साहित्यनगरीत पंडित जळगावकर नाट्यगृहात रविवारी आ. राजेश टोपे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी प्रा. शिवाजी हुसे यांची, तर स्वागताध्यक्षपदी दिनेश फोके यांची निवड झाली आहे. संमेलनाला आ. नारायण कुचे, तहसीलदार दत्तात्रय भारस्कर, नगराध्यक्षा संगीता कुचे, डॉ. अशोक देशमाने, डॉ. सुशीला सोलापुरे, डॉ. संजीवनी तडेगावकर, शेख इक्बाल मिन्ने, डी. एन. जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यानिमित्त रविवारी सकाळी सात ते नऊ दरम्यान श्रीपंचकृष्ण ज्ञानआश्रम ठाकूरनगर येथून ग्रंथदिंडीचा प्रारंभ होईल. प्राचार्य डॉ. भागवतराव कटारे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होईल. यावेळी आचार्य भानुकवी वाङ्मय पुरस्कार आणि आद्य कवयित्री महदंबा काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. साडेअकरा ते दीड वाजेच्या दरम्यान 'महानुभाव साहित्यिकांचे मराठी साहित्याला योगदान या विषयावर परिसंवाद होणार असून, अध्यक्षस्थानी डॉ. बळवंत भोयर हे असतील. दुपारी वनिता गायकवाड यांचा 'मी महदंबा बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग होणार आहे. तसेच जागर जाणिवांचा हा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम डॉ. विनोद जाधव आणि संच सादर करणार आहे. तीन ते पाच या सत्रात महंत विश्वनाथबाबा शेवलीकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. संमेलनास माजी आ. विलास खरात, शिवाजी चोथे, सभापती सतीश होंडे, उपसभापती किशोर नरवडे, उपनगराध्यक्ष केदार कुलकर्णी आदींची उपस्थिती राहील.