आगीत तहसीलमधील निरोपयोगी कागदपत्रे खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:18 AM2019-11-13T00:18:04+5:302019-11-13T00:19:04+5:30
येथील तहसील कार्यालयाच्या दोन जुन्या इमारतीच्या मागील बाजूच्या खोल्यांना मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत दोन खोल्यातील जुने जीर्ण झालेले आणि निरोपयोगी रेकोर्ड जळून खाक झाले.
जाफराबाद : येथील तहसील कार्यालयाच्या दोन जुन्या इमारतीच्या मागील बाजूच्या खोल्यांना मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत दोन खोल्यातील जुने जीर्ण झालेले आणि निरोपयोगी रेकोर्ड जळून खाक झाले. सुटीच्या दिवशी ही आग लागली होती. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
गत पाच वर्षांपूर्वी तहसील कार्यालयास नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. या जुन्या इमारतीत शासनाचे सेतू सुविधा केंद्र सुरू होते. नंतर ते बंद झाल्यानंतर ही इमारत दुर्लक्षित होती. या इमारीतील खोल्यांमध्ये तहसीलची जुनी कागदपत्रे, बारदाना होता. मंगळवारी सुटीच्या दिवशी या इमारतीतील दोन खोल्यांना अचानक आग लागली.यात जुनी कागदपत्रे, बारदाना (पोते) जळून खाक झाला. आग लागल्याचे समजताच नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आग विझविण्यासाठी जाफराबाद व भोकरदन येथील अग्निशमन दलाची गाडी बोलाविण्यात आली होती. वाहन उशिरा आल्याने नागरिकांनी खासगी टँकर मागवून आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्न केला. आग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर आग पूर्ण पाने आटोक्यात आली.
आग आटोक्यात आणण्यासाठी सपोनि अभिजित मोरे यांच्यासह पोलीस दल, अग्निशामक दलाचे कर्मचारी, माजी उपनगराध्यक्ष दीपक वाकडे, गजानन उदावंत, लक्ष्मण शेवाळे, शेख शकील, राजू ब्रहाटे, महमद शमी, विशाल वाकडे, राहुल वाकडे, ज्ञानेश्वर पाबळे, कैलास बकाल, योगेश वाकडे, समाधान सरोदे, सिकंदर सिद्दीकी, ऋषी ब्राहाटे यांच्यासह इतरांनी प्रयत्न केले. तहसीलच्या जुन्या खोल्यांना आग कोणत्या कारणाने लागली, हे उशिरापर्यंत समजू शकले नाही.