जालन्यात दहावीच्या पहिल्याच पेपरला कॉपी करणाऱ्या १० विद्यार्थ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:37 PM2019-03-01T17:37:10+5:302019-03-01T17:37:36+5:30
परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची कडक तपासणी करण्याचे निर्देश आहेत.
जालना : दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात म्हणून यंदा बोर्डाने अधिकची खबदारी घेतली आहे. शुक्रवारी मराठी व हिंदी विषयाचा पेपर होता. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंठा तालुक्यातील दोन विद्यालयातील चक्क १० विद्यार्थ्यी कॉपी करताना पकडल्याने खळबळ उडाली आहे.
दहावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर कॉपी करण्याचे प्रकार सुरू आहेत. कितीही सूचना दिल्यावरही विद्यार्थी मोठ्या हात चलाखीने कॉपी सोबत आणत असल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आले. प्रारंभी परीक्षा केंद्रावर येतानाच विद्यार्थ्यांची कडक तपासणी करण्याचे निर्देश आहेत. अशाही स्थितीत विद्यार्थी शक्कल लढवून कॉपी परीक्षा केंद्रात आणत आहेत. शुक्रवारी मंठा तालुक्यातील रेणुकादेवी विद्या मंदीर शाळेत भरारी पथकाने अचानक भेट दिली. भरारी पथक आल्याचे कळल्यावर विद्यार्थ्यांची मोठी तारंबळ उडाली. प्रत्येक विद्यार्थ्यांची कडक तपासणी केल्यानंतर आठ विद्यार्थी कॉपी करतांना पकडले. तसेच मंठा तालुक्यातीलच छत्रपती संभाजी विद्यालयातील दोन विद्यार्थी कॉपी करत असल्याचे आढळून आले.
३१ हजार विद्यार्थी देतायत परीक्षा
या प्रकरणी दहा विद्यार्थ्यांना रस्टकिट करण्यात आल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. जालना जिल्ह्यात यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी जवळपास ३१ हजार विद्यार्थी बसले आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या लक्षात घेता सहा भरारी पथकासह बैठे पथकीही तैनात करण्यात आले आहे.