जालना जिल्ह्यात वर्षभरात २३ रोडरोमिओंवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:39 AM2018-12-25T00:39:04+5:302018-12-25T00:39:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कॉलेजच्या तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या दामिनी पथकाने वर्षभरात २३ प्रतिबंधात्मक कारवाया ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कॉलेजच्या तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या दामिनी पथकाने वर्षभरात २३ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. तक्रारी आल्यानंतर कारवाई करणाऱ्या या दामिनीचा रोडरोमियोंवर वचक असल्याचे दिसून येत आहे. शहरातील दामिनी पथक सरस असून, बारा महिन्यात या पथकाने शहर व जिल्ह्यातील १९५ शाळा व ५२ महाविद्यालयांना भेटी दिल्या आहेत.
शहरातील विविध शाळा महाविद्यालयांच्या आजूबाजूला रोडरोमियोंचा वावर असतो. विद्यार्थिनींना अशा रोडरोमियोंकडून छेडछाड करण्याच्या घटनाही घडतात. या छेडछाडीची तक्रार करण्यासही विद्यार्थिनी घाबरत असल्याची बाब पोलिसांना लक्षात आल्यावर २०१४ साली शहरात दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाला स्वतंत्र वाहन देण्यात आले असून, महिला पोलीस अधिकां-यासह चार महिला पोलीसही या पथकात आहेत. वर्षभरात या पथकाने १९५ शाळा, ५२ महाविद्यालयांना भेटी दिल्या आहे. तर ४३ रोडरोमियोंना १४९ ची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच २३ रोडरोमियोंवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची नोंद आहे.
शहरात दररोज राऊंड
मध्यवर्ती शहरात साधारणत: दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत शाळा कॉलेजच्या आसपास रोडरोमियोंचा सुळसुळाट असतो. दामिनी पथक यावेळी अशा शैक्षणिक संस्थांच्या परिसरात सातत्याने राऊंड मारते. एखाद्या विद्यार्थिनीने तक्रार केल्यानंतर लगेचच हे पथक घटनास्थळी जाऊन कारवाई करते.
१९५ शाळा व
५२ महाविद्यालयांना भेटी
शहरात रोडरोंमियोंना आळा घालण्यासाठी दामिनी पथकाच्यावतीने विविध शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन, विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या पथकाने वर्षभरात १९५ शाळा व ५२ महाविद्यालयांना भेटी दिल्या आहे.
जालना शहरात दामिनी पथकाची स्थापना २०१४ साली करण्यात आली. हे पथक स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. या पथकात सहायक पोनि. नालंदा लाडंगे, सोनाली खांडेकर, आरती साबळे, ऊषा साबळे, रेणुका राजपूत, रुपाली नेवाड हे काम पाहतात. वर्षभरात या पथकाने २३ जणांवर कारवाई केली आहे.
विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण देण्याची गरज
शहरातील शालेय विद्यार्थिनींना रोडरोंमियोपासून बचाव करण्यासाठी कराटेचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यामुळे विद्यार्थींनाच आपले संरक्षण करता येईल.